

पणजी: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागवार आरक्षण जाहीर केले. त्यात महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, माजी महापौर उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो यांसारख्या दिग्गजांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मडकईकर यांचा १४ क्रमांकाचा प्रभाग गतनिवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी होता. आता तो ओबीसी राखीव झाला आहे, तर फुर्तादो यांचाही सहा क्रमांकाचा खुला प्रभाग यावेळी ओबीसी राखीव झाला आहे. त्यामुळे दोघांना निवडणूक रिंगणात उतरायचे झाल्यास अन्य प्रभाग शोधावे लागणार आहेत. आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार महापौर रोहित मोन्सेरात यांचा गत निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन हा खुला होता.
तो प्रभाग यावेळी ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित मोन्सेरात यांना शेजारील ४ क्रमांकाच्या खुल्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. मागील निवडणुकीत क्रमांक ४ हा प्रभाग महिला राखीव होता. त्याठिकाणी माजी महापौर तथा महिला नगरसेवक कॅरोलिना पो या सहजरित्या निवडून आल्या होत्या. त्यांच्या जागेवर रोहित यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.
याशिवाय मोन्सेरात गटाच्या कट्टर समजल्या जाणाऱ्या शुभदा शिरगावकर यांचा क्रमांक पाच हा महिला राखीव प्रभागही आता ओबीसींसाठी राखीव केला आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, पहिल्या क्रमांकाचा प्रभाग २०२१ च्या निवडणुकीत खुला ठेवला होता. त्याठिकाणी अपक्ष उमेदवार तथा माजी नगरसेवक नेल्सन काब्राल यांनी बाजी मारली होती. हा प्रभाग आता अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवला आहे.
याशिवाय आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याच पाठबळावर महापौर झालेले सुरेंद्र फुर्तादो यांनी गतनिवडणुकीत विरोधकाची भूमिका बजावल्याने आणि थेट महापौरांशी पंगा घेतल्याने त्यांना यावेळी ही खुन्नस महागात पडल्याचे दिसते. कारण त्यांचा मागील निवडणुकीत खुला असणारा क्रमांक सहा प्रभाग आता ओबीसीसाठी राखीव केला आहे. शिवाय त्यांच्या पत्नी रूथ फुर्तादो यांचाही नऊ क्रमांकाचा प्रभाग महिला राखीवऐवजी खुला करण्यात आला आहे.
१. मळ्यातील प्रभाग क्र. १९ मधील नगरसेवक नीलेश मोरजकर यांना कामाला लागा, असा संदेश मिळाल्याने त्यांनी प्रभागात कामही सुरू केले; पण त्यांचा प्रभाग महिला राखीव केल्याने कदाचित त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
२. शुभम चोडणकर यांचा प्रभाग क्रमांक २० हा गतनिवडणुकीत ओबीसी होता. तो आता खुला केला आहे. त्यामुळे याठिकाणी चोडणकर यांना खुल्या प्रभागातून किंवा प्रभाग २१ मधून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे.
३. कारण प्रभाग क्रमांक २१ हा महिला राखीव होता. तो प्रभाग ओबीसी राखीव झाल्याने तेथील विद्यमान नगरसेविका मनीषा मणेरकर यांच्याही चिंता वाढल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.