पणजी, पणजी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राचा महत्त्वाचा भाग असलेल्या रायबंदर परिसरात उशिरा सुरू झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामांचा परिणाम येथील नागरिकांना भोगावा लागत आहे.
परक्यासारखी वागणूक मिळत असल्याची भावना येथील नागरिकांची बनली आहे. सर्वत्र खोदकाम आणि वळविलेल्या वाहतुकीच्या त्रासामुळे रायबंदरवासीय कमालीचे त्रस्त बनले आहेत.
रायबंदर येथे अजूनही मॅनहोलची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे आणि नागरिकांचे हाल होत आहेत. सुरवातीला स्मार्ट सिटीची कामे सुरू झाली तेव्हा या परिसरातील लोकांना पाण्याच्या आणि प्रवासाच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते.
सध्या परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी मागील एक-दीड महिन्यापासून धुळीचा झालेला त्रास रायबंदरवासीय कधीच विसरू शकणार नाहीत. अगोदरच अरुंद रस्ते, त्यात स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामामुळे येथील नागरिकांची झोपही गायब झाली होती.
स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत पदपथ निर्मितीचे काम ज्या ठिकाणी मॅनहोल येणार नाही, अशा ठिकाणी झालेले आहे. गटाराचे व मॅनहोलचे काम आणखी किती दिवस चालणार आहे, हेही निश्चितपणे येथे काम करणाऱ्या कामगारांना सांगता येत नाही. गतीने कामे करण्यासाठी अधिक मनुष्यबळ लावा, असे सांगितले असले तरी ही कामे करणारा वर्ग तेवढ्या अधिक क्षमतेचा दिसत नाही.
रायबंदर हा भाग चोडण, दिवाडी व जुने गोवे या भागातील लोकांसाठी पणजीत येताना मध्यठिकाण ठरतो. हा मार्ग पोर्तुगीजकालीन असल्याने हा परिसरही तेवढाच ऐतिहासिक आहे. अत्यंत दाटीवाटीने घरे असणारा हा परिसर आपली वेगळी ओळख टिकवून आहे. अशा ठिकाणचा नागरिक सध्या स्मार्ट सिटीची कामे कधी पूर्ण होणार, याच विवंचनेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.