Panaji Municipal Budget 2023: पणजी महापालिकेच्या इतिहासात केवळ पाच मिनिटात अंदाजपत्रकास मंजुरी मिळण्याची घटना सोमवारी घडली. या विशेष बैठकीत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ९९.८१ कोटींच्या महसूल प्राप्तीचा आणि ९८.०९ कोटींच्या खर्चाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
या बैठकीत विरोधी गटातील नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, रुथ फुर्तादो, उदय मडकईकर, ज्योएल आंद्रादे यांची अनुपस्थिती होती. त्याशिवाय सत्ताधारी पक्षाचे तीन नगरसेवक गैरहजर होते.
महापालिकेच्या सभागृहात महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त क्लेन मेदैरा, उपमहापौर संजीव नाईक यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली.
लेखा व कर अधिकारी सिद्धेश नाईक यांनी अंदाजपत्रकाच्या आकडेवारीचे वाचन केले. आकडेवारी वाचन होताच सर्वांनी ‘पास'' म्हणत अंदाजपत्रक पास केले.
परंतु चहा पिण्यापर्यंत मिळालेल्या वेळेत मात्र नगरसेवक कबीर पिंटो माखिजा, प्रसाद आमोणकर, शुभम चोडणकर, कॅरिलिना पो यांनी प्रश्न उपस्थित केल्याने बैठकीचा कालावधी आणखी १५ मिनिटे वाढला.
महापालिकेने यापूर्वीच मार्केटमधील सोपोकर वाढीस मान्यता दिली आहे. त्याशिवाय वाढीव कमी करून ती घरपट्टी एकाच कक्षेत आणल्याने पूर्ण वसुली होण्यास मदत होईल आणि त्यातून महापालिकेच्या महसूल वाढीस मदत होईल, असे महापौर मोन्सेरात यांनी सांगितले.
मागील २०२२-२३ वर्षी एकूण महसूल प्राप्ती ६४ कोटी ४१ लाख ४८ हजार ४९८ रुपये झाली. तर खर्च ५६ कोटी १२ लाख ८६ हजार ७४० रु. खर्च दाखविला होता. परंतु २०२३-२४ साठी अपेक्षित महसूल प्राप्ती ९९ कोटी ८१ लाख, ६० हजार १०० रुपये, तर खर्च ९८ कोटी ०९ लाख, ०८ हजार रु. दाखविण्यात आला आहे.
घटनाक्रम
२०२३-२४ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस १ कोटी ७२ लाख शिल्लक.
लेखा व कर अधिकारी सिद्धेश नाईक यांनी अंदाजपत्रकाचे केले वाचन.
उपस्थित नगरसेवकांकडून अंदाजपत्रकावर केवळ एकच मुद्दा उपस्थित.
विरोधी गटातील सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर, रुथ फुर्तादो, ज्योएल आंद्रादे यांची अनुपस्थिती.
जी-२० च्या कामांविषयी मांडल्या सूचना.
महापालिका मार्केटची ४५ कोटींची थकबाकी
महापालिकेच्या मार्केटचे थकीत भाडे ४५ कोटी रुपयांचे आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे व्यावसायिकांच्या मागणीनुसार लीज करारानुसार भाडेकरार होणे अपेक्षित आहे.
जोपर्यंत भाडेकरार होत नाही, तोपर्यंत दुकानांना आम्ही टाळे ठोकू शकत नाही, असे महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले.
विशेष अधिकारी
मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्ती न होण्यामागे विविध कारणे आहेत. त्यात मार्केट भाडेकरार, नॅशनल थिएटर, महापालिका इमारत याठिकाणची थकबाकी वाढली आहे.
महसूल वाढीसाठी हळू-हळू प्रयत्न सुरू आहेत, परंतु नॅशनल थिएटरचा विषय मार्गी लावण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
सरकारी पातळीवर हा विषय मार्गी लावण्याठी तो पाठपुरावा करणार आहे. महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नासाठीचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे भाडेकरार हा आहे. मार्केटमधील दुकानदारांशी भाडेकरारही व्हायचा बाकी आहे. तोही मुद्दा यावेळी चर्चेत आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.