सहा महिन्यांहून अधिक काळ स्वस्त धान्य दुकानांवरून धान्यसाठा न उचललेल्या तसेच वार्षिक पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या मिळून सुमारे 90 हजार कुटुंबीयांची रेशनकार्ड रद्द करण्यात आली आहे.
सरकारने दोन वर्षांपूर्वी परिपत्रक काढून सहा महिन्यांहून अधिक काळ धान्यसाठा न उचललेल्या कुटुंबांची रेशनकार्डे निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत सुमारे ८३ हजार रेशनकार्डे निलंबित केली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक बाणावली (२२,१३७) तर सर्वांत कमी रेशनकार्डे (८६९) धारबांदोडा तालुक्यातून निलंबित केली आहेत.
अन्नपूर्णा योजनेखालील (एएनपी) ६५, घरमालक प्राधान्य (पीएचएच) ९८६२, अंत्योदय अन्न योजना (एएवाय) ६६५ यांचाही निलंबित केलेल्या रेशनकार्डांमध्ये समावेश आहे. निलंबित केलेल्यांपैकी ७१,६४८ रेशनकार्डे ही दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांची आहेत. काहींनी पुन्हा कार्ड पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने कंटाळून त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
ज्यांचे वार्षिक वेतन ५ लाखांपेक्षा अधिक आहे, त्या नोकरदारांनी रेशनकार्डे परत करावीत, असा आदेश सरकारने काढला होता. त्यासाठी अर्ज भरून तो नागरी पुरवठा खात्याकडे सादर करण्यास सांगितले होते. बहुतेक सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे पाच लाखांपेक्षा अधिक असल्याने प्रत्येक खात्याला हा आदेश पाठवला होता.
मात्र, खात्याकडे नोंद झालेल्या आकडेवारीनुसार १७ हजार रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डे परत केली आहेत. त्यामध्ये फोंडा (२,५६९) व सत्तरी (२,३९३) या तालुक्यांतील कार्डधारकांची संख्या जास्त आहे. सांगे (५४७) व धारबांदोडा (३८९) या तालुक्यांतून सर्वात कमी कार्डे सादर केली आहेत. कोविड काळात नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील धान्य तसेच डाळी कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
तक्रारीनंतर क्राईम ब्रँचने छापे टाकून काही ट्रकांमधील धान्यसाठा जप्त केला होता. नागरी पुरवठाच्या गोदामातील या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले होते. नागरी पुरवठा खात्याकडे २,८३,५९१ रेशनकार्डे असून त्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेखाली ११,०४८, दारिद्र्य रेषेवरील १,५४,७००, प्रायोरिटी हाऊसहोल्डखाली १.१७,८३५ रेशनकार्डे आहेत.
तालुका निलंबित कार्ड जमा कार्ड
पेडणे २६५५ ११३५
बार्देश १५७०६ २२९८
डिचोली ३४३५ १९२३
सत्तरी २००३ २३९३
तिसवाडी ११४०९ १५६२
फोंडा ७७९२ २५६९
तालुका निलंबित कार्ड जमा कार्ड
मुरगाव ८०९ ८१४
सासष्टी २२१३७ १३२१
धारबांदोडा ८६९ ३८९
केपे ३९३१ ११५२
सांगे १८४१ ५४७
काणकोण २३६७ ८६५
गैरप्रकारांना बसणार आळा
नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील गैरव्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी राज्यातील ११ गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे नियंत्रण संचालकांच्या कार्यालयात आहे. त्यामुळे या गोदामातील व्यवहारावर थेट पणजीतून नजर ठेवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.