Govind Gaude, Deepak Dhavalikar
Govind Gaude, Deepak DhavalikarDainik Gomantak

Goa Politics: गावडेंच्या वर्चस्वाला धक्का, ढवळीकरांचे हौसले बुलंद! प्रियोळमध्ये समीकरण बदलाचे संकेत?

Govind Gaude: मंत्रिपद गेल्यामुळे गोविंद गावडे यांच्या प्रियोळातील वर्चस्वाला धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक त्यांना जड जाऊ शकते, असा होरा राजकीय विश्‍‍लेषक आत्तापासूनचं वर्तवू लागले आहेत.
Published on

फोंडा: ताज्‍या राजकीय घडामोडींमुळे प्रियोळ मतदारसंघातील समीकरणे बदलण्याचे संकेत मिळायला लागले आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळात फोंडा तालुक्याला जे शंभर टक्के प्रतिनिधित्व मिळाले होते, त्यातही आता गावडेंच्या गच्छंतीमुळे घट झाली आहे.

मंत्रिपद गेल्यामुळे गोविंद गावडे यांच्या प्रियोळातील वर्चस्वाला धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक त्यांना जड जाऊ शकते, असा होरा राजकीय विश्‍‍लेषक आत्तापासूनचं वर्तवू लागले आहेत.

२०१७ साली अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या गोविंद गावडेंनी तत्कालीन मंत्री दीपक ढवळीकर यांचा जवळजवळ ५००० मतांनी पराभूत करून विधानसभेत धडाकेबाज प्रवेश केला. त्‍यावेळी त्‍यांना मनोहर पर्रीकर यांच्या सरकारात मंत्रिपदही देण्यात आले.

पण नंतरच्या म्‍हणजेच २०२२च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार तसेच कला-संस्कृतीमंत्री असूनही त्यांची विजयाची आघाडी २१३ मतांवर घसरली होती. साहजिकच आता मंत्रिपद नसल्यामुळे गावडेंसमोर आगामी निवडणुकीत मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असा तर्क व्यक्त केला जात आहे.

दुसऱ्या बाजूला गेल्या निवडणुकीत निसटता पराभव प्राप्त झालेले मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे ‘हौसले बुलंद’ झाले आहेत. भोम-अडकोण, प्रियोळ, वेरे-वाघुर्मे या प्रियोळ मतदारसंघातील पंचायतींत आजही मगो पक्षाचा जो प्रभाव आहे, त्याचा फायदा ढवळीकर यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो.

त्याचबरोबर मगो-भाजप युती झाल्यास हा मतदारसंघ मगोला देऊन ‘सुंठीवाचून खोकला गेला’ या उक्तीचा प्रयोग भाजप करू शकतो, असे मतही व्यक्त केले जात आहे. आणि युती झाली तरी गोविंद गावडे यांना भाजपची उमेदवारी मिळेल की काय, याबाबतही शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरून २६९७ मते प्राप्त केलेले संदीप निगळ्ये हेही भाजप उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. मात्र शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते.

Govind Gaude, Deepak Dhavalikar
Goa Politics: गावडेंच्या अडचणी वाढल्या! प्रियोळातच आव्‍हान; बेतकी-खांडोळा सरपंचांवर अविश्‍‍वास; इतर ठिकाणी हालचाली सुरू

त्याचबरोबर अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास गोविंद गावडे यांना किती मते पडू शकतात, यावरही खल सुरू झाला आहे. गेल्या वेळी या मतदारसंघातून २५१७ मते प्राप्त केलेल्‍या ‘आरजी’ पक्षाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामानाने आम आदमी व काँग्रेस या दोन पक्षांचे अस्तित्व या मतदारसंघात नगण्य असल्यामुळे त्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता तशी धुसरच आहे.

एकंदरीत गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून दूर केल्यामुळे प्रियोळ मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेकजण नवीन समीकरणांवर लक्ष ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. आता यातून कोणाची नाव किनाऱ्याला लागते आणि कोणाची डुबते, हे कळायला मात्र आणखी दीड वर्षे थांबावे लागणार, हे निश्‍चित.

Govind Gaude, Deepak Dhavalikar
Govind Gaude: शिवीगाळ, वादग्रस्त कारभार आणि बंडाची भाषा… गावडेंचं वळण चुकलंच! अखेर मिजास उतरवली

आता ‘झेडपी’ निवडणुकीवर लक्ष

येत्‍या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. सगळ्यांचे लक्ष या निवडणुकांवर लागले आहे. प्रियोळ मतदारसंघासाठी या निवडणुका ‘ॲसिड टेस्ट’ ठरणार असून त्यातून कोण तावून-सुलाखून निघतो, हे बघावे लागेल. प्रियोळात एकूण चार जिल्हा पंचायती येतात. त्यातील एक मडकई तर दुसरी एक फोंडा मतदारसंघाशी जोडली गेली आहे. सध्या या चार जिल्हा पंचायतींपैकी दोन भाजपकडे तर दोन मगोकडे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत यात बदल होतो की काय, ते पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com