
Smart city mission works progressing fast in Panaji
पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत उर्वरित अर्ध्या पणजी शहरातील कामे वेगाने सुरू आहेत. स्मार्ट सिटीची कामे संपविण्याची मुदत ३१ मार्च म्हणजेच आतापासून ८२ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सध्या काही रस्त्यांवरील वाहतूक बंद केली गेली असल्याने वाहनधारकांना वळसा घेऊन अनेक ठिकाणी मार्गक्रमण करावे लागत आहे.
या कामांचा पणजीकरांसह शहरात येणाऱ्या इतरांनाही त्रास सोसावाच लागणार आहे. स्मार्ट सिटीची कामे सध्या ज्या गतीने सुरू झाली आहेत, ती जोडरस्त्यांची आहेत आणि ती एकदा पूर्ण झाल्यानंतर महत्त्वाचे दोन रस्त्यांचे काम हाती घेतले जाणार आहे. अजूनही सध्या मलनिस्सारण वाहिनीसाठीचे चेंबरचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे अर्धे रस्ते अडविले गेल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.
सध्या या कामांमुळे समाजमाध्यमांतून फक्त काही नेटकरी व्यक्त होतात. परंतु आमदार बाबूश मोन्सेरात यांनी चांगल्या काही सुविधा निर्माण करण्यापूर्वी थोडा त्रास सहन करावा लागतो, असे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे कदाचित पणजीकरही तो त्रास सहन करीत आहेत. मात्र, स्थानिक नागरिक म्हणून माध्यमांपुढे कोणी उघडपणे नाराजी व्यक्त करीत नाहीत.
दरम्यान, स्मार्ट सिटीच्या कामांच्या दर्जाबाबत सुरुवातीपासून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या गटारांचे व इतर पदपथ निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र, कामे झाल्यानंतर त्यांच्या मजबुतीसाठी पाण्याचा मारा होणे अपेक्षित आहे; पण तो केला जात नाही. त्यावर विचार होणे गरजेचे आहे.
सध्या सांतिनेजमध्ये इमराल्ड टॉवर्ससमोरील रस्त्याचे काम सुरू असल्याने १८ जून मार्गाकडे जाणारी वाहतूक ओरियन हॉटेलकडून वळविली आहे. याशिवाय कांपालमधील विवांता हॉटेलमागून येणाऱ्या व १८ जून मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे, तसेच गीता बेकरी ते टू बाय टू सिग्नल या लष्करी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यामुळे मामलेदार कचेरीत जाणाऱ्यांना वाहने गीता बेकरीशेजारील उद्यानाभोवती दोन्ही बाजूला पार्क करावी लागत आहेत. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याची ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत आहे. त्यामुळे आता उर्वरित ८२ दिवसांत कामे पूर्ण करावी लागणार आहेत. ही कामे सुरू झाल्यामुळे पणजीकरांना एवढे दिवस त्रास सहन करावाच लागणार आहे, हे मात्र स्पष्ट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.