Panaji Boat Accident : चाळीस वर्षांपूर्वीच्या करूण आठवणींनी दाटतोय कंठ; १९८४ सालच्या होडी दुर्घटनेला चार दशके पूर्ण

Panaji Boat Accident : नावाड्याने होडी मार्गस्‍थ केली; पण नियतीच्‍या मनात काही वेगळंच होतं. जुवारी-मांडवीला जोडणाऱ्या प्रवाहात एका बार्जच्‍या नांगरावर होडी आदळली आणि २६ जणांना जलसमाधी मिळाली.
Panaji Boat Accident
Panaji Boat AccidentDainik Gomantak

Panaji Boat Accident :

पणजी, भर दुपारी सुटलेला सोसाट्याचा वारा आणि जोडीला जोरदार पाऊस सुरू होता. शेतात राब राब राबून भुकेलेले जीव नेवरा येथून होडीने मडकईला परतत होते.

नावाड्याने होडी मार्गस्‍थ केली; पण नियतीच्‍या मनात काही वेगळंच होतं. जुवारी-मांडवीला जोडणाऱ्या प्रवाहात एका बार्जच्‍या नांगरावर होडी आदळली आणि २६ जणांना जलसमाधी मिळाली.

या अनपेक्षित दुर्घटनेमुळे गोव्‍यात हाहाकार माजला. मृतांची कुटुंबे उघड्यावर पडली. सरकारने अशावेळी फारसे काही केले नसताना छातीचा कोट करून सढळ मदतीचा हात देण्‍याचे महत्‍कार्य दैनिक ‘गोमन्‍तक’ने केले. १३ जून १९८४ ला झालेल्‍या अपघाताच्‍या कटू आठवणींना आज ४० वर्षे होत आहेत.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकार्य कसे केले जाऊ शकते, याचा ‘गोमन्तक’ने आदर्श तेव्हा उभा केला तो अनुकरणीय आहे, अशीच भावना आजही मडकईत आहे. मृतांच्‍या मागे राहिलेल्‍या कुटुंबीयांना चांगले जीवन देण्यासाठी सरकारने फारसे काही केले नव्‍हते; पण गोमन्तक पुढे सरसावला. लोकांना आवाहन करण्‍यात आले आणि लाखो रुपयांचा निधी

Panaji Boat Accident
Goa Todays Live Update: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

जमा झाला आणि ती मदत मुदत ठेवीच्या रूपाने मृतांच्या नातेवाईकांना, वारसांना दिली गेली. त्याची आठवण ४० वर्षांनंतरही काढली जाते.

‘गोमन्तक’शी संवाद साधलेल्या प्रशांत गावडे, गजानन तारी, कुमार कलानंद मणी, अनंत गावडे, भारती बांदोडकर, सावित्री गावडे, होनू गावडे आदींनी ‘गोमन्तक’ने केलेल्या कामाची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की ‘गोमन्तक’चे तत्कालीन संपादक स्‍व. नारायण आठवले हे दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पोचले. त्यांनी केवळ शाब्दीक सांत्वन केले नाही, तर त्यांच्यासोबत तरुण कार्यकर्ते होते.

त्यापैकी डॉ. नंदकुमार कामत, स्व. विष्णू वाघ, ॲड. समीर बांदोडकर, रशिदा मुजूमदार, महेश सोनक, स्‍व. सिरील पाशेको यांनी यात पुढाकार घेतला होता. मडकई दुर्घटनाग्रस्तांना कोणती मदत हवी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करायला हवे, याचा अभ्यास करून इतर स्वयंसेवी संस्थांची मदत घेत त्यांनी सामाजिक काम आक्सणवाडा परिसरात उभे केले. ‘गोमन्तक’ या साऱ्याच्या केंद्रस्थानी होता.

‘गोमन्तक’ने वेळीच दिलेला मदतीचा हात आजही अनेकांना आठवतो. काहींना शिक्षणासाठी, रोजगारासाठी, लग्नादी कार्यासाठी ‘गोमन्तक’ने दिलेल्या निधीचा उपयोग झाल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख सर्वांच्या बोलण्यात आजही आहे.

आपदग्रस्तांना मदत करण्यासाठी त्‍या काळात सरकारी योजना नव्हती. आपत्ती व्यवस्थापन विभागही त्याकाळी अस्तित्वात नव्हता. त्या काळात माध्यमाची ताकद काय असते, हे ‘गोमन्तक’ने दाखवून दिले होते. वाचकांना ‘गोमन्तक’ने आवाहन करताच अनेकांनी कष्टाने कमावलेल्या पैशांचा काही वाटा मडकई होडी दुर्घटनेच्या आपदग्रस्तांसाठी दिला. अगदी १० रुपयांपासून हे निधी संकलन झाले होते. त्यातून लाखो रुपयांचा निधी ‘गोमन्तक’च्या विश्वासापोटी उभा राहिला.

१३ जून १९८४ हा गोव्याच्या इतिहासातील एक काळा दिवस होता. होडी दुर्घटनेनंतर दैनिक ‘गोमन्तक’चे तत्कालीन संपादक (स्व.) नारायण आठवले उर्फ ‘नाना’ यांनी अखिल गोवा विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून मदतनिधीचे सुयोग्य वितरण करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मडकईत दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यास मला सांगितले आणि वाहनांची सोय केली. तेथे झाले ते भयंकर गरिबीचे दर्शन.

कित्येकजण क्षयरोगी. गळक्या झोपड्या. सगळे भूमिहीन व शेतमजुरी करून पोट भरणारे. आम्ही दिलेल्या अहवालानुसार दैनिक ‘गोमन्तक’ने मदतनिधी वापरला. नंतर अनेक वर्षे आम्ही त्या दुर्दैवी कुटुंबांच्या संपर्कात राहिलो. या दुर्घटनेनंतरच्या सर्वेक्षणामुळे मला गावडे आदिवासी समाजाच्या समस्यांची खरी जाणीव झाली, जी आजही कायम व‌ प्रखर आहे‌‌.‌ पण खरे क्रांतिकारी कार्य दैनिक ‘गोमन्तक’नेच केले आणि संवेदनशील लोकाभिमुख पत्रकारितेचा महान आदर्श निर्माण केला हे समाजाने आज ४० वर्षांनंतर तरी कृतज्ञतापूर्वक मान्य करायलाच हवे.‌

‘गोमन्तक’ केवळ निधी उभा करून थांबला नाही. अज्ञानी असलेले वारस सज्ञान होईपर्यंत त्यांना केवळ व्याज मिळेल, याची व्यवस्था केली. या निधीचे व्यवस्थापन राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविलेल्या ‘पीसफुल सोसायटी’ या तेवढ्याच ताकदीच्या बिगर सरकारी संस्थेकडे सोपविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com