Panaji Accident : अपघातांचे ग्रहण सुटता सुटेना... जबाबदार कोण? चालकांना राहिला नाही धाक

Panaji Accident : दंडात्मक रक्कमेत दुपटीने वाढ झाली असली तरी चालकांचा वाहन चालविताना होणारा बेफिकिरपणा तसेच नियम उल्लंघनाची भीती नसल्याने हे अपघात घडत आहेत.
Panaji Accident
Panaji AccidentDainik Gomantak

विलास महाडिक

Panaji Accident :

पणजी, बेशिस्तपणा व मद्यपानामुळे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाहतूक पोलिस यंत्रणा मद्यपी चालकांविरुद्ध अनेकवेळा अधूनमधून विशेष मोहीम आखूनही त्यांची कारवाई कमी पडत आहे.

दंडात्मक रक्कमेत दुपटीने वाढ झाली असली तरी चालकांचा वाहन चालविताना होणारा बेफिकिरपणा तसेच नियम उल्लंघनाची भीती नसल्याने हे अपघात घडत आहेत.

अपघाताच्या गुन्ह्यात कायद्यात असलेल्या पळवाटा व असलेली दुर्मिळ शिक्षा यामुळे चालकांना कोणताच धाक राहिलेला नाही. हे अपघात रोखण्यासाठी दरवर्षी रस्ता वाहतूक सप्ताहातून जनजागृती करूनही त्याचा काहीच निष्पन्न होत नसल्याचे सध्याच्या घडणाऱ्या अपघातांच्या सत्रावरून दिसून येत आहे.

मद्यपान हेच भीषण अपघाताला कारणीभूत ठरत आहे. भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून किंवा वाहन चालवताना डुलकी येऊन अपघात होणे याचे प्रमाण तसे कमी आहे. हल्लीच गेल्या आठवड्यात वाहतूक पोलिसांनी मद्यपीविरोधात विशेष मोहीम आखून सुमारे ८० मद्यपी चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली होती.

ही मोहीम दरदिवशी राबवणे कर्मचाऱ्यांअभावी वाहतूक पोलिस विभागाला शक्य होत नाही. रात्रभर ही मोहीम राबविल्यानंतर हे कामगार दुसऱ्या दिवशी कामावर येणे अशक्य असते.

स्ता अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास पोलिस अपघाताच्या वर्गीकरणानुसार भा.दं.सं.च्या कलम ३०४ किंवा ३०४ ए खाली चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करतात.

अधिक तर गुन्हे हे ३०४ ए खाली नोंदवले जातात. हा गुन्हा अदखलपात्र व जामीनपात्र असल्याने संशयित चालकाला जामीन देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. त्यामुळे राज्यात अधिक तर अपघाताला कारणीभूत असलेले चालक हे परप्रांतीय असतात.

अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास या ३०४ ए कलमाखाली जास्तीत २ वर्षे शिक्षा व दंड आहे.

मद्य घेऊन चालकाने वाहन चालविले व एखाद्याचा मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कलम ३०४ खाली नोंदवला जातो. या गुन्ह्यासाठी दंड व जास्तीत जास्त दहा वर्षीची शिक्षा आहे.

या अपघातामुळे एखाद्याचे कुटुंबच उद्‍ध्वस्त झालेले असते त्यामुळे हा मृत्यू म्हणजे खुनाचाच प्रकार असतो मात्र तो जाणुनबुजून नसतो हे सिद्ध होत नाही. त्यामुळे कायद्यात या पळवाटा आहेत त्याचा फायदा चालकाला मिळत आहे.

सहा महिन्यात २०० बळी : गेल्या वर्षी रस्ता अपघातात २,८४६ अपघातांमध्ये एकूण २९० जणांचे मृत्यू झाले. या वर्षी सहा महिने उलटण्यापूर्वीच मृत्यूची संख्या २०० पार झाली आहे. गोव्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. गोव्यात येणारे पर्यटकांना रस्त्यांची जाण नसते त्याचा फटका रस्ता अपघातांना बसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला या अपघातासंदर्भात गहन विचार करण्याची गरज आहे. रस्ता अपघातात २०२४ मध्ये तीन दिवसांमागे ५ जणांचा मृत्यू होत आहे.

गेल्या वर्षी दुचाकी अपघातात २०९ मृत्यू

२०२३ मध्ये ७२.०६ टक्के म्हणजेच २०९ मृत्यू हे दुचाकी चालक किंवा त्याच्या मागे बसलेल्यांचे झाले. या २०९ जणांपैकी ६५.५५ टक्के म्हणजेच १३७ जणांनी हेल्मेटचा वापर केलेले नव्हते. या वर्षीही हेल्मेट असूनही ते डोक्यात घातले नसल्यामुळे अनेक स्वारांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांत मृत्यू झालेल्या २९० पैकी २०९ दुचाकीचालक आणि मागे बसलेल्यांचे मृत्यू झाले होते. त्यातील १०४ दुचाकी चालकांनी तर ३३ दुचाकीच्या मागे बसलेल्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते.

Panaji Accident
Goa School : राज्‍यातील शाळा ४ जूनपासून सुरू : शिक्षण संचालक शैलेश झिंगडे

पाच वर्षांत ९२२ दुचाकीस्वारांचा मृत्यू

दरम्यान, २०२४ पूर्वी राज्यातील मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिली असता, १,३०७ जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यातील ७०.५४ टक्के म्हणजे ९२२ दुचाकीचालक आणि मागे बसलेल्यांचे मृत्यू झाले होते. त्यात ४७९ दुचाकी चालक आणि १४२ मागे बसलेले मिळून ६७.३५ टक्के म्हणजे ६२१ जणांनी हेल्मेट घातले नसल्यामुळे मृत्यू झाले होते. तर ३२.६५ टक्के म्हणजे ३०१ जणांनी हेल्मेट घातले होते.

५० अपघातप्रवण क्षेत्रांबाबतचा अहवाल धूळ खात

मद्य घेऊन वाहन चालवू नका अशी जागृती करणारे फलक रस्त्याच्या बाजूने लावलेले आहे, मात्र याकडे कितीजण कटाक्षाने लक्ष देऊन त्याचे पालन करतात हा गहन प्रश्‍न आहे. काही रस्ते अरुंद आहेत व वळणे आहेत, त्यामुळेही अपघात घडत आहेत. या अपघातांसंदर्भातचा अभ्यास पीडब्ल्यूडी, पोलिस व वाहतूक विभागाने संयुक्तपणे केला होता. त्यावेळी सुमारे ५० अपघातप्रवण क्षेत्रे शोधण्यात आली होती. त्याचा अहवाल सरकारी पातळीवरही पाठवण्यात आला होता. या प्रकरणाला वर्ष उलटून गेले तरी तो अजूनही धूळ खात पडला आहे.

मद्यपान वाहन न चालवण्याकडे दुर्लक्ष, निष्काळजीपणा, सावधगिरी न बाळगणे, रस्ता माझ्यासाठीच आहे व दुसऱ्याचा विचार न करणे अशा पद्धतीने वाहन चालक वागतात. त्यामुळे हे अपघात घडतात. नियमांचे काटेकोरपणे कोणीच सहसा पालन करत नाही. गेल्या निवडणुकीपासून दक्षिण गोव्यात हेल्मेट न वापरणाऱ्यांविरोधात तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह प्रत्येक आठवड्याला शुक्रवारी वा शनिवारी रात्रभर मोहीम सुरू केली आहे. अकस्मात मोहीम केल्यासच मद्यपी सापडतात. दरदिवशी अशा मोहिमा मनुष्यबळअभावी शक्य नाहीत.

- सुनीता सावंत, दक्षिण गोवा अधीक्षक

हल्ली पोलिसांनी अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर पूर्वीप्रमाणे भा.दं.सं.च्या ३०४ ए कलम लागू न करता ३०४ खाली सदोष मनुष्यवध गुन्हा नोंद करू लागले आहेत. ३०४ ए हे कलम अदखलपात्र व जामीनपात्र तर ३०४ हे कलम दखलपात्र व अजामीन असते. त्यामुळे संशयित चालक काही दिवस तरी कोठडीची हवा खातो. त्याला बाहेर येण्यासाठी जामिनासाठी धडपड करावी लागते. मात्र तपासकामाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर पोलिस चालकाविरोधात ३०४ चा गुन्ह्यानुसार हेतुपुरस्सर (इंटेन्शन) पुरावे सादर न केल्याने ३०४ ए खाली आरोप निश्‍चित होतात.

- सुषमा मांद्रेकर, सरकारी वकील

व्यावसायिक वाहनांच्या अपघातामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. त्यामुळे चालक वाहन चालवण्यास जागेवर बसण्याआधी तो मद्यपान केलेला नाही याची जबाबदारी वाहन मालकाची आहे. त्याचप्रमाणे चालकांना कामाचा ताण लादू नये व पुरेशी विश्रांती देणेही त्या मालकाचे काम आहे. कंपनीतून कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यापूर्वी चालक मद्यपान केलेला नाही याची खात्री त्यातील प्रवाशांनीही करण्याची गरज आहे. इतर देशात ज्याप्रमाणे चालकाच्या वागण्यावर देखरेख ठेवली जाते त्याप्रमाणे येथेही अंमलबजावणी असा प्रस्ताव सरकारकडे मांडणार आहे.

- ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com