छत्रपती शिवराय म्हणजे अफाट सामर्थ्य, स्वाभिमानी नेतृत्व, प्रजाहित जपणारा राजा आणि अलौकिक बुद्धिवंत असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. छत्रपती शिवरायांनी आपल्या केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यात स्वराज्य निर्मितीसाठी केलेले नियोजन हे कोणत्याही काळातील सर्वोत्कृष्ट नियोजन आहे.
शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य दिले. त्यांची शिवनीती आजही समजून घेण्याची गरज असून शिवरायांच्या पैलूंना समजून घेणारा व्यक्ती आपल्या जीवनात कधीच अपयशी आणि पराभूत होणार नाही, असे प्रतिपादन सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
वास्को येथील रवींद्र भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. रुपेश पाटील बोलत होते. रविवारी सायंकाळी वास्को (गोवा ) येथील रवींद्र भवन येथे गोवा क्षत्रिय मराठा समाज यांच्या मुरगांव शाखा, वास्को आयोजित 'चला छत्रपती शिवरायांना समजवून घेऊ.!' या विषयावर प्रा. रुपेश पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमास गोवा राज्याचे सांस्कृतिक, कला व क्रीडा मंत्री गोविंद गावडे, मुरगांव मतदार संघाचे आमदार संकल्प आमोणकर, गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष पद्मनाभ आमोणकर, गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे केंद्रीय समिती सदस्य विजय केळुस्कर, मुरगांव शाखेचे अध्यक्ष प्रा. सुनील शेट, महिला अध्यक्ष सौ. अक्षदा वाडेकर, महिला सरचिटणीस सौ. वैशाली आमोणकर, खजिनदार सौ. सुनीता फडते आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी प्रमुख वक्ते प्रा. रुपेश पाटील आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य निष्ठा, स्वाभिमानी बाणा, युद्धनीती, उत्तम नियोजन आणि जीवन जगण्याची आदर्श पद्धती शिकवून दिली आहे.
महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी आपल्या स्वराज्यात निष्ठावंत मावळे निर्माण केले. जीवाला जीव देणारे सवंगडी महाराजांकडे असल्यामुळे महाराजांनी बलाढ्य शत्रूंसमोर आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण केले.
शिवारायांच्या नियोजनावर आता अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन केले जात असून पाश्चात्य देशांमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन गुरु' असे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले जात आहेत. असे असतानाही आजची युवा पिढी मात्र शिवचरित्राचा फारसा अभ्यास करताना दिसत नाही, अशी खंतही प्रा. पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान प्रा. रुपेश पाटील यांनी 'प्रतापगडाचा रणसंग्राम' आणि 'शिवा काशीद यांचे बलिदान' हे ऐतिहासिक प्रसंग आपल्या ओघवत्या शैलीत सादर करून उपस्थिती शिवप्रेमी बांधवांची मने जिंकली.
यावेळी उपस्थित गोवा राज्याचे सांस्कृतिक, कला व क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनीही आपल्या खुमासदार शैलीत शिवचरित्राचे महत्त्व विशद केले. मंत्री गावडे म्हणाले, आजच्या मुलांना आणि युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे वाचन केले पाहिजे. कारण वाचनाने मन आणि मेंदू दोन्हीही बळकट होतात. छत्रपती शिवरायांनी केलेला संघर्ष ज्यांनी ज्यांनी अभ्यासला त्यांनी यशाला गवसणी घातली आहे, असेही मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
आमदार संकल्प आमोणकर म्हणाले मुरगांव शाखेच्या क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने वेळोवेळी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविता येता. या सर्व समाज बांधवांना योग्य ते सहकार्य केले जाईल. तसेच आगामी काळात समाज बांधवांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासन आणि शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ज्येष्ठ समाज बांधवांचा सन्मान -
यावेळी समाजातील जेष्ठ नागरिक तुळशीदास खवणेकर, वासुदेव धावडे, दिगंबर आमोणकर, रमेश फडते, रवळनाथ पेडणेकर या बांधवांचा मंत्री गोविंद गावडे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मुरगांव शाखेचे अध्यक्ष प्रा. सुनील शेट यांनी केले.
सूत्रसंचालन सौ. सुनयना शेट यांनी तर आभार प्रदर्शन अक्षदा वाडेकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.