गंगाराम आवणे
पणजी: बह्मांड कसे आहे, ग्रह आणि तारे किती आहेत, आकाशगंगा काय आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात मिळू शकतात. फन सायन्स दालनाद्वारे विज्ञानासोबतच मनोरंजन होते. दरवर्षी सुमारे दीड लाख लोक या केंद्राला भेट देतात, असे विज्ञान केंद्राचे परियोजना समन्वयक व्यंकट दुर्गा प्रसाद के. यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
गोवा विज्ञान केंद्रात सागर विज्ञान, फन सायन्स, आरशांचे विविध प्रकार असलेली दालने आहेत, तसेच सायन्स पार्कही आहे, अनेक प्राण्यांच्या भवदिव्य प्रतिकृती देखील पाहू शकतात. फन सायन्स हे दालन एका विशिष्ट संकल्पनेवर आधारीत नाही तर भौतिक, रसायन, मेकॅनिक अशा विविध विषयांवर आहेत. त्यामुळे विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण होऊन आवड निर्माण होते, असे प्रसाद म्हणाले.
हे उपक्रम राबविले जातात
केंद्रात सागर विज्ञान, फन सायन्स आणि सायन्स पार्क प्रदर्शनासह मनोरंजनात्मक पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा शोध घेणारे उपक्रम राबविले जातात. थ्रीडी फॅन्टसी कार्यक्रम प्रत्यक्ष विज्ञान प्रात्याक्षिके सादर केली जातात. सायबर लॅबद्वारे तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती आणि प्रशिक्षण सर्व वयोगटातील नागरिकांना देण्यात येते. या केंद्रात १४० लोकांच्या क्षमतेचे वातानुकूलित सभागृह आहे, ज्यात विज्ञानाशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. विज्ञान प्रदर्शन बसद्वारे ग्रामीण भागात देखील पोहोचवले जाते.
सूर्यमाला आणि विश्वाच्या संरचनेबद्दल ज्ञान प्रदान करण्यासाठी ॲनिमेशन आणि डिजिटल व्हिडिओ प्रोजेक्शन तसेच फिल्म क्लिपच्या माध्यमातून कार्यक्रम सादर केला जातो. दर दिवशी असे चार कार्यक्रम सादर केले जातात. तसेच शाळांच्या आग्रहावरून अतिरिक्त कार्यक्रम देखील होतात. अगोदर कळवून आलेल्या गटांना विशेष माहिती देणारे कार्यक्रम, प्रात्याक्षिके आदी दाखविली जाऊ शकतात. त्याचे नियोजन करण्यासाठी अगोदर सूचित करणे गरजेचे असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.