Goa Accidental Deaths : सुमारे पंधरा वर्षांपूर्वी राज्यात दर ३६ तासाला रस्तेअपघातात एक मृत्यू व्हायचा. आज वाहनांची संख्या बेसुमार वाढल्यामुळे हे प्रमाण २२ तासांवर येऊन ठेपले आहे. ही स्थिती नियंत्रणात आणायची असेल तर राज्यात रस्ता सुरक्षा संस्कृती रुजवायची गरज आहे, असे मत प्रसिद्ध शवविच्छेदनतज्ज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात डॉ. घोडकिरेकर हे सध्या शवविच्छेदन विभागाचे प्रमुख आहेत. दोन दिवसांत किमान एक अपघाती बळीचा मृतदेह त्यांच्याकडे येत असतो. त्यातील बहुतांश मृत्यू हे थेट अपघातस्थळीच झालेले असतात. ही परिस्थिती निश्चितच विचार करण्यासारखी आहे, असे ते म्हणाले.
डॉ. घोडकिरेकर म्हणाले, मागच्या तीन वर्षांत राज्यात रस्तेअपघातांत जाणाऱ्या बळींची संख्या उतरली होती. याचे कारण म्हणजे कोविडमुळे वाहने रस्त्यांवर येणे कमी झाले होते. मात्र आता रस्त्यावर वाहने वाढली, साहजिकच अपघात व बळीही वाढले. २००२ साली डॉ. घोडकिरेकर यांनीच पुढाकार घेतल्याने दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालून गाडी चालवावी यासाठी गंभीरपणे मोहीम सुरू करण्यात आली होती. हीच मोहीम आता पुन्हा एकदा हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
‘रस्तासुरक्षा’ शालेय अभ्यासक्रमाचा भाग होणे गरजेचे
कोविड काळात ज्या गांभीर्याने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना घेण्याबाबत जागृती झाली, त्याच प्रमाणावर आता रस्त्यावर वाहने हाकताना कोणते उपाय योजण्याची गरज आहे त्यावर जागृती होण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामपातळीवर जागृती झाली पाहिजे.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना दंड करण्यावर जास्त भर न देता जर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर त्या स्वाराला स्वतः किती धोका आहे याची जाणीव करून देण्यावर भर द्यावा, असे डॉ. घोडकिरेकर म्हणाले.
कित्येक अपघातांत विद्यार्थ्यांचाही मृत्यू झालेला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन रस्तासुरक्षा हा आता शालेय अभ्यासक्रमाचा भाग होणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.