

पणजी/बांदा: गेले महिनाभर मडुरा परिसरात तळ ठोकलेला ‘ओंकार’ हत्ती आता दोडामार्गच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागल्याचे दिसत आहे. शनिवारी (ता.२५) इन्सुलीत दाखल झालेला हत्ती दुपारी तेरेखोल नदीपात्र ओलांडून वाफोली गावात दाखल झाला. सायंकाळी उशिरापर्यत तो वाफोली माऊली मंदिर परिसरात होता. इन्सुलीत दोन्ही (जुना व नवा) मुंबई-गोवा महामार्ग ओलांडून हत्ती सुखरूप इन्सुलीतून बाहेर पडला. महामार्ग ओलांडत असताना दोन्ही वेळा काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
ओंकार हत्ती काल सायंकाळी निगुडे गावातून इन्सुलीत दाखल झाला. इन्सुली-डोबवाडी येथील मुंबई-गोवा महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपला मोर्चा सावंतटेम्ब व कुडवटेम्ब या परिसरात वळविला. रात्रभर कुडवटेम्ब येथे तो ठाण मांडून होता. पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास तो कुडवटेम्ब येथील चर्चकडे महामार्ग ओलांडण्यासाठी आला.
मात्र, महामार्गावर असलेली वाहने आणि बघ्याची गर्दी पाहून तो पुन्हा माघारी गेला. त्यानंतर पुन्हा ८.३० वाजण्याच्या सुमारास तो महामार्ग नजीक असलेल्या एका घराच्या तुलसी वंदावनासमोर आला. त्यानंतर तो महामार्गाच्या दिशेने वळला. वनविभागाच्या टीमने ओंकारला मोठ्या सावधानतेने भरवस्तीतुन धुरीवाडी येथील लिंगेश्वर मंदिर परिसरात नेले.
मंदिराला लागून नदी असून ओंकारला मार्ग दाखवला तरच तो पुढे जातो. त्यामुळे भरलेल्या नदीतून त्याला पलीकडे घेऊन जाण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी नदीतून कोणीतरी पुढे जाणे गरजेचे होते. अशावेळी आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक रिद्धेश तेली व निलेश मोर्ये यांनी नदीत उडी टाकून नदीपात्रात असलेल्या खडकावर उभे राहून ओंकारला बोलावून घेतले. तुडुंब भरलेल्या नदीतून त्याला वनविभागाचे कर्मचारी वाफोलीत घेऊन गेले. दरम्यान, त्याने नुकसान न केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
‘ओंकार’ हत्तीला पुरेसे पोटभर खाद्य मिळत नसल्याने तो सैरभैर फिरत आहे. वनविभागाने त्याच्या खाद्याची व्यवस्था प्राधान्याने करणे आवश्यक आहे. ऊस किंवा भेडल्या माडाची पाने विपुल प्रमाणात देऊन त्याचे पोट भरेल, अशी व्यवस्था वनविभागाने करणे गरजेचे आहे. हत्तीप्रश्नी वारेमाप खर्च करणाऱ्या वनविभागाकडे त्यासाठी निधी नाही का, असा प्रश्न ग्रामस्थांमधून होत आहे.
मडुरा येथील नदीत मगरींची संख्या बरीच मोठी आहे. ओंकार अंघोळीसाठी उतरला असता तो ओरडत नदीतून बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. मगरीने त्याच्या पायाचा चावा घेतला असावा, असा स्थानिकांचा अंदाज आहे. त्यानंतरच मडुरा गावात सुमारे तीन आठवडे ठाण मांडून राहिलेला हत्ती रोणापाल, निगुडे, इन्सुली, वाफोली अशी दरमजल करीत पुढे पुढे जात आहे. मगरीच्या भीतीने त्याने मडुरा गाव सोडल्याचा ग्रामस्थांचा अंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.