

मोरजी: ‘ओंकार’ हत्तीचा खेळ कधी संपणार? सरकार एखाद्या दुर्घटनेची तर वाट पाहात नाही ना? असा संतप्त सवाल मोपा - उगवेतील शेतकरी करीत असून या हत्तीचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा दिला आहे.
वाळू उत्खन होत असताना लोकांना कायदा हातात घ्यावा लागला, तर आता हत्तीने हानी केल्यानंतर लोकांनी कायदा हातात घेतल्यानंतर सरकारने धाव घेण्याऐवजी अगोदर या ओंकार हत्तीचा बंदोबस्त करावा, असे मत सरपंच सुबोध महाले यांनी व्यक्त केले. गरज पडली तर शेतकऱ्यांसोबत आपणही रस्त्यावर येऊ, असा इशारा त्यांनी दिला.
ओंकार हत्तीने तिसऱ्या दिवशी उगवे परिसरातील बागायतीचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. कवाथे, केळींबरोबरच या हत्तीने दोन वाहनांचेही नुकसान केले आहे. त्यात सरपंच सुबोध महाले, माजी सरपंच शशिकांत महाले, पंच दयानंद गवंडी, शांताराम राणे यांच्या बागायतीतील कवाथे, केळी, पोफळीचा समावेश आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी वन खात्याने ओंकार हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
सुबोध महाले यांनी माहिती देताना सांगितले की, काल रात्री अडीच वाजता ‘ओंकार’ हत्ती आपल्या निवासस्थान परिसरात आला. त्या ठिकाणी वडिलांना जाग आली. कोणीतरी गाडी उचलतो आणि आपटतो असा वडिलांना भास झाल्यानंतर ते बाहेर आले. त्यांनी आपल्याला उठवले, तेव्हा ‘ओंकार’ हत्ती गाडीची नासधूस करत असल्याचे दिसले. यावेळी काही नागरिक तेथे जमल्यानंतर कवाथे खाऊन ‘ओंकार’ पुढच्या दिशेने गेला.
वन खात्याचे कर्मचारी हा ‘ओंकार’ हत्ती कुठे जातो? कुठे वास्तव्य करून राहतो? याचा मागावा घेत असतात. सकाळी पोटभर खाल्ल्यानंतर तो एखाद्या पाण्याच्या परिसरात जातो किंवा झाडाझुडपात जातो आणि त्या ठिकाणी तीन ते चार तास एकाच जाग्यावर असतो. पावसाळ्यात त्याचा माग घेताना पायांचे ठसे ओळखणे सहज शक्य असते, परंतु आता सहजासहजी त्याचा शोध घेताना अडचणी येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.