

North Goa road closure notice: उत्तर गोव्यातील वाहतुकीची धमनी मानल्या जाणाऱ्या पर्वरी येथील महामार्गावर आता आगामी दोन महिने प्रवाशांना कसरत करावी लागणार आहे. पर्वरी उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकारी अंकित यादव (IAS) यांनी मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत रस्ता बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. हे निर्बंध २ जानेवारी २०२६ पासून ते २ मार्च २०२६ पर्यंत लागू राहतील.
प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, ओडीपी (ODP) रस्त्यावरील P16 ते दामिन दे गोवा जवळील P20 पर्यंतचा रस्ता पूर्णपणे बंद असेल. तसेच, पर्वरीतील प्रसिद्ध कदंब हॉटेल ते ओ'कॉकेरो जंक्शन पर्यंतच्या मार्गावरही वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, म्हापसाहून पणजीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सध्याच्या मार्गावरील एक मार्गिका (Lane) सुरू ठेवली जाईल, जेणेकरून अत्यावश्यक वाहतूक सुरू राहू शकेल.
या नव्या आदेशानुसार, जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनांना म्हापसा बाजूकडून ओडीपी रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या रस्त्यावरील तीव्र चढणीमुळे अवजड वाहने अडकून पडण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. वळवण्यात आलेले सर्व मार्ग सुस्थितीत असावेत आणि तिथे पुरेशी प्रकाशव्यवस्था असावी, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
कोंडीचा विचार करून प्रशासनाने कडक अटी घातल्या आहेत. पुलाचे मोठे लोखंडी किंवा सिमेंटचे भाग दिवसा वाहून नेण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, ही वाहतूक केवळ रात्रीच्या वेळीच केली जाईल. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र 'डेडिकेटेड लेन' राखली जाणार आहे. तसेच, रस्त्यात एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास ते तत्काळ बाजूला करण्यासाठी कंत्राटदाराला क्रेनची व्यवस्था करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पर्वरी परिसरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता, वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटदाराने प्रत्येक वळणांवर किमान दोन ट्रॅफिक मार्शल तैनात करणे आवश्यक आहे. हे मार्शल २-२ च्या शिफ्टमध्ये काम करतील. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस अधीक्षकांच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांनी सहकार्य करावे आणि आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.