म्हापसा: मागील काही महिन्यांपासून गोव्यात ध्वनिप्रदूषणाचा विषय प्रचंड गाजत आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत स्थानिकांकडून पोलिसांकडे वेळोवेळी अनेक तक्रारी केल्या जात होत्या. याच पार्श्वभूमीवर, उच्च न्यायालयाने रात्री १० वा.पर्यंत संगीत वाजविण्याचे निर्देश दिले होते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेशही दिले होते.
तरीही हे कर्णकर्कश संगीताचे प्रकार बिनदिक्ततपणे मध्यरात्री उशिरापर्यंत संबंधित पोलिस स्थानकांच्या हद्दीत घडत असताना, पोलिस मात्र सोयीस्करपणे याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे पोलिस व ध्वनिप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एकंदरित कामाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सध्या हणजूण-वागातोर हा भाग ध्वनिप्रदूषण उल्लंघनाचे केंद्रस्थानच बनले आहे, असे लोकांच्या तक्रारींवरून अधोरेखित होते. याच पार्श्वभूमीवर, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून येत्या रविवारी (ता.१८) मोठ्या प्रमाणात हणजूण व वागातोर परिसरात ट्रान्स पार्ट्यांचे नियोजन केले आहे. त्याच्या जाहिराती ऑनलाईन व हणजूणमध्ये केल्या जात आहेत. याविरोधात आवाज उठविण्यासाठी मागील दोन दिवस स्थानिकच डोळ्यांत तेल घालून रात्रीच्या वेळी स्वतः गस्त घालून यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक आपल्या सुरक्षेसाठी स्वत: लढताना दिसत आहेत.
या आंदोलनात विद्यार्थी, महिला व वयोवृद्धांचा सहभाग उल्लेखनीय आहे. सलग दोन दिवस शंभरपेक्षा अधिक लोकांनी हणजूण पोलिस स्थानकावर मेणबत्ती मोर्चा काढला व पोलिसांकडून कारवाईसाठी होणाऱ्या दिरंगाईबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, पोलिसांकडून तोंडी आश्वासनाव्यतिरिक्त ठोस कृती होताना दिसत नाही, असा आरोप स्थानिकांचा आहे. हा कर्णकर्कश आवाज बंद होत नसल्याने स्थानिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
हणजूण हा समुद्रकिनारा लाभललेला शांत गाव आहे. परंतु येथील शांतता सध्या दिवस-रात्र वाजणाऱ्या संगीताच्या असहनीय आवाजामुळे भंग झाली आहे, असे स्थानिकांचे मत आहे. किनारी भागात मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट व क्लब कार्यरत आहेत.
या भागांत इनडोअर क्लब खूप कमी प्रमाणात आहेत. परिणामी, जे रेस्टॉरंटच्या नावाने क्लब कार्यरत आहेत, ते मोठ्या आवाजात संगीत वाजवतात आणि पर्यटकांना याचे खास आकर्षण असते.
गोव्याबाहेरदेखील रेस्टॉरंट व क्लब संस्कृती रुजू आहे; परंतु समुद्रकिनारा व मोकळेपणा नसल्याने लोक गोव्यात विशेषतः हणजूण, वागातोर, हरमल, मोरजी या भागांना पसंती देतात. विकेण्ड किंवा एकामागोमाग सुट्ट्या आल्या की अशाप्रकारे पार्ट्यांचे नियोजन केले जाते. यापूर्वी देखील हे प्रकार घडायचे; परंतु सोशल मीडिया त्यावेळी इतका सक्रिय नव्हता. सध्या सोशल मीडिया व इतर तांत्रिक क्रांतीमुळे लोक अशा बेकायदा कृतीबाबत थेट फेसबुक लाइव्ह व इतर सोशल माध्यमांतून याविषयी आवाज उठविताना दिसत आहेत.
ध्वनिप्रदूषणावर आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने रात्री १० वा.पर्यंत संगीत वाजविण्याचे निर्देश संबंधित आस्थापनांना दिले होते. तरीही या आदेशाचा भंग होतानाच सर्वत्र दिसत आहे. राज्याच्या किनारपट्टी भागातील लोकांना ध्वनिप्रदूषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हणजूण-वागातोर किनारी भागात रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत जोरजोरात ध्वनियंत्रणा वाजवून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण केले जात असल्याने लोकांनी एकत्र येत त्याचा निषेध केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.