पणजी: एक यशस्वी स्टार्टअप कंपनीचा मालक होणे हे एक अवघड ध्येय असले, तरी ते अशक्य नाही हे पराष्टे - पेडणे येथील युवक निरंजन निगळ्ये व वास्को येथील नितीन बोरगावे यांनी दाखवून दिले आहे. सामान्य कुटुंबातील या युवकांनी स्टार्टअपमधून आपले करिअर घडविण्याचा धाडशी निर्णय घेतला आणि त्यात त्यांनी यशस्वी मार्गक्रमण सुरू केले आहे. विशेष म्हणजे स्टार्टअप सुरू करताना त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये शिकलेल्या आपल्या ज्युनिअर व सिनिअर अशा १३ विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला आहे. गोमंतकीय युवकांनी स्टार्टअपमधून केलेली ही उल्लेखनीय कामगिरी समस्त गोमंतकीयांना अभिमानास्पद आणि प्रेरणादायी अशीच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास आणि होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतून स्टार्टअपची योजना आखली असून नवतरुणांना स्टार्टअप सुरू करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला अनुसरून देशाच्या विकासात आणि पर्यायाने रोजगार निर्मितीस हातभार लावण्याच्या हेतूने स्टार्टअप सुरू केल्याचे निरंजन निगळ्ये यांनी सांगितले. खरे तर स्टार्टअप सुरू करायचे म्हटले, तर त्यासाठी खूप वेळ तर द्यावा लागतोच, शिवाय पैशांची गुंतवणूकही करावी लागते. परंतु कमीत कमी भांडवलाच्या म्हणजे केवळ २.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर त्यांनी सुरू केलेला स्टार्टअप इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
सडा - वास्को येथील इन्स्टिट्यूट ऑफ शिपबिल्डींग टेक्नॉलॉजी (आयएसबीटी) या संस्थेत चार वर्षांचा शिपबिल्डिंग इंजिनिअरींगचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर निरंजन निगळ्ये यांनी याच क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमासाठी विशाखापट्टनम येथील इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटीमध्ये तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. हा अभ्यासक्रम करताना त्यांनी प्रत्येक सेमिस्टरमध्ये उत्कृष्ट गुण संपादन करून संस्थेतर्फ दिले जाणारे रोख पारितोषिकही पटकावले आहे. त्याबद्दल त्यांचा रँक पदक विजेता म्हणून भारत सरकारच्या जहाजोद्योग मंत्रालयातर्फे श्री. राधाकृष्णन आणि मनसुख मांडविया यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यापूर्वीच त्यांची पवई - मुंबई येथील ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग’ या बोट बांधणीच्या डिझाईनला प्रमाणित करणाऱ्या कंपनीमध्ये कँपसद्वारे निवड झाली.
मुंबईत चार वर्षे काम केल्यानंतर त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी गोव्यात आपला स्वतंत्र व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच ‘निरमॉन डिझाईन इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेंजमेंट सर्व्हीसेस’ या कंपनीची स्थापना झाली. कांपाल - पणजी येथे एक कार्यालय घेऊन केवळ २.५ लाख रुपयांच्या भांडवलावर आपला गोव्यातीलच मित्र नितीन बोरगावे यांना बरोबर घेऊन त्यांनी या कंपनीची स्थापना केली. दोघांचाही या क्षेत्रातील सारखाच अनुभव असल्याने आणि आपल्या राज्यात व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करण्याचे दोघांचेही उद्दिष्ट असल्याने त्यांनी ही कंपनी सुरू केली. आज या कंपनीमध्ये त्यांनी नियमित दहाजणांना व कंत्राट पद्धतीवर तिघांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
‘निरमॉन डिझाईन इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेंजमेंट सर्व्हीसेस’ या स्टार्टअप कंपनीतर्फे विविध जहाजबांधणी कंपन्यांना जहाज/बोट बांधणीचे, प्रवासी कार्गो जहाज, तसेच जहाजातील ऑईल टँकरचे डिझाईन तयार करून दिले जाते. त्यात पाईप डिझाईन, इंजिनचा आकार, फायबर, ॲल्युमिनियमचा वापर, कोणत्या मशिनरी किती आकाराच्या असाव्यात, जहाजाला गळती लागलीच, तर दुसरीकडे पाणी जाऊ नये यासाठीचे उपाय आदींबाबत शिपयार्डच्या मालकाला सहकार्य केले जाते.
समस्येवर उपाय शोधले...
गेल्यावर्षी जानेवारी २०१९ मध्ये कारवार येथे बोट दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची कारणमीमांसा करताना कर्नाटकच्या बंदर संचालनालयाने (डायरेक्टर ऑफ पोर्ट) आमच्या कंपनीला या दुर्घटनेमागची कारणे शोधून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाय सूचविण्याचे काम सोपविले होते. आम्ही त्या ठिकाणाला भेट देऊन त्या बोट बांधणी आणि डिझाईनमधील त्रुटी शोधून काढल्या व त्यावर योग्य उपाय सूचविले. त्याबद्दल कर्नाटकच्या डायरेक्टर ऑफ पोर्टने आमच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली, असे निरंजन निगळ्ये यांनी अभिमानाने सांगितले.
‘शिका आणि व्यावसायिक व्हा’
शिपबिल्डिंग क्षेत्रात संपूर्ण जगात अनेक चांगल्या संधी आहेत. त्यामुळे केवळ डिग्री मिळविण्यासाठी म्हणून शिकू नका. प्रत्यक्ष जीवनात वावरताना त्याचा फायदा व्हावा असे प्रॅक्टीकल होऊन शिका, यश आपोआप मिळेल, असा संदेश निरंजन निगळ्ये व नितीन बोरगावे यांनी या क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य
सुरवातीला मी मुंबईत एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होतो. या कंपनीतील जॉब सोडताना थोडे टेन्शन आले होते. कारण या कंपनीतील नोकरी म्हणजे एक ‘ड्रीम जॉब’ होता. परंतु स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निश्चय पक्का केला. सर्वप्रथम मी माझ्या आई - वडिलांना विचारले, त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे आजचे जे यश आहे, ते त्यांच्यामुळेच मिळालेले आहे. माझ्या कंपनीतील वरिष्ठांनीही मला स्टार्टअप सुरू करण्यास उत्स्फुर्त केले. माझे मित्र नितीन बोरगावे, सुजोद गावकर यांनीही हा धनुष्यबाण उचलण्यास हातभार लावला. या स्टार्टपसाठी आम्हाला आमचे वरिष्ठ रणजित पवार (महाराष्ट्र) यांनी मोलाचे सहकार्य केले आणि यापुढेही आम्हाला त्यांचे मार्गदर्शन मिळत राहणार आहे, असे निरंजन निगळ्ये यांनी सांगितले.
जागतिक पातळीवर सेवा देण्याचा मानस
केवळ १७ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या स्टार्टअपनंतर आता विविध ठिकाणांहून कामांचे कंत्राट मिळत असल्याने देशात अनेक ठिकाणी आपली कार्यालये सुरू करण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यानुसार सध्या विशाखापट्टनम व सुरत येथे दोन कार्यालये सुरू केली आहेत. दुबईतूनही आम्हाला कामाच्या ऑर्डर्स मिळत आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही दुबई येथेही कार्यालय सुरू करणार आहे. त्यामुळे परदेशातील पैसा आपल्या देशात येण्यास हातभार लागेल. गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश येथे आणखी कार्यालये सुरू करून देशाबरोबरच जागतिक पातळीवर सेवा देण्याचा आमचा मानस आहे. तसेच आमच्या व्यवसायाद्वारे देशात ऑप्टिमाईझ डिझाईनला वाव देत जहाज डिझाईनची संस्कृती रुजविण्याचा आमचा हेतू आहे, असे निरंजन निगळ्ये यांनी सांगितले.
असे झाले स्टार्टअप...
संपादन: ओंकार जोशी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.