

पणजी: ई-फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रसाराविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स संघटनेने (एआयओसीडी) बुधवारी छेडलेल्या देशव्यापी आंदोलनाला गोव्यातील फार्मसींकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इस्पितळांतील फार्मसी वगळता इतर फार्मसी बुधवारी दिवसभर बंद राहिल्या. त्याचा फटका काही जणांना सहन करावा लागला.
ऑनलाईन औषध प्लॅटफॉर्मवर कठोर नियमन आणि जीएसआर ८१७ व जीएसआर २२० या अधिसूचना मागे घेण्याची मागणी करीत ‘एआयओसीडी’ने बुधवारी देशव्यापी आंदोलन छेडले. द केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन गोवानेही (सीडीएजी) या आंदोलनात सहभागी होत, बुधवारी दिवसभर फार्मसी बंद ठेवण्याचे आवाहन फार्मसी मालकांना केले होते. त्यानुसार इस्पितळे वगळता इतर भागांतील फार्मसी मालकांनी बुधवारी दिवसभर फार्मसी बंद ठेवल्या. त्यानंतर त्या सायंकाळी सुरू करण्यात आल्या. डिचोली, पणजी, वास्को, फोंड्यात सर्वाधिक प्रतिसाद लाभला.
औषधांची बेकायदेशीर आणि अनियंत्रित ऑनलाईन विक्री, वैध आणि प्रमाणित प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री आणि घरपोच वितरण तसेच ऑनलाईन औषध प्लॅटफॉर्मद्वारे केल्या जाणाऱ्या शोषक आणि मोठ्या सवलतींच्या पद्धती या तीन गंभीर मुद्द्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती ‘सीडीएजी’चे अध्यक्ष अमित कामत आणि सरचिटणीस प्रसाद तांबा यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.