New Zuari Bridge : गडकरींची मध्यस्थी; झुआरी पुलावर रंगले नाराजीनाट्य

झुआरी पुलाच्या उद्‌घाटन सोहळ्यात भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून येत मोठे नाराजी नाट्य रंगले.
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

झुआरी पुलाच्या उद्‌घाटन सोहळ्यात भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून येत मोठे नाराजी नाट्य रंगले. या नाट्याचा केंद्रबिंदू केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही दाद न दिल्याने अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मध्यस्थी करावी लागली आणि या नाराजी नाट्यावर पडदा टाकावा लागला. मात्र, एक कार्यकर्ता बोलून गेला ‘कुणाच्या जीवावर ही सुख भोगताहेत हे!’ वापरा आणि फेकून द्या, हे आता भाजपात वाढू लागले आहे.

सध्या शांत झालेले हे नाराजी नाट्य इथेच संपणार की पुन्हा उफाळून येणार, हे येणारा काळच ठरवणार आहे. त्याचे घडले असे, केंद्रीय पर्यटन, बंदर विकास व जहाजबांधणी राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसे मितभाषी आणि मवाळ स्वभावाचे. त्यांचा कुणाशीच राजकीय संघर्ष वा वैर नाही. मात्र, अलीकडे त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये डावलले जात असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी झुआरी पुलावर मुख्य सचिवांना जाब विचारला. उद्‌घाटनाचा सोहळा पुलाच्या सुरुवातीला मुख्य कार्यक्रमापासून दूर होता तिकडे जाण्यासाठी पुलावर दोन बग्गीची सोय केली होती. एकात मुख्यमंत्री आणि गडकरी आणि इतर काहीजण गेले तर दुसऱ्या बग्गीत सभापती आणि खासदार तेंडुलकर यांच्यासह इतर काही जण बसले.

New Zuari Bridge
Sunburn: सनबर्नमध्ये भान नव्हे 'मोबाईल' हरवले; अनेक iphone चोरीला, तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात झुंबड

श्रीपाद भाऊंना मात्र कुणीही बोलविले नाही आणि विचारलेही नाही. त्यातच जिथे ते बसले होते त्याच्या समोर आणखी सोपे आणून टाकण्यात आले आणि त्यावर भाजपचे कार्यकर्ते बसून राहिले. या सोहळ्यासाठी या महामार्गावर लावण्यात आलेल्या शेकडो बॅनरमधून भाऊंना हटविण्यात आले होते. या सर्वांचा राग इथे निघाला. हा जाब सचिवांना विचारल्यावर बिथरलेल्या सचिवांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. मग मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केला. मात्र, रागावलेल्या भाऊंनी त्यांनाही दाद दिली नाही. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करत भाऊंना बोलावून घेत उद्‌घाटन सोहळ्यात सहभागी करून घेतले. आणि नाराजी नाट्यावर पडदा टाकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com