Goa: गर्दीने फुललेले किनारे, वाहनांनी भरलेले रस्ते, हाऊसफुल्ल झालेली हॉटेल-रेस्टॉरंटस असा माहोल आज दिवसभर राज्यात खासकरून किनारी भागात अनुभवायला मिळाला. देश-विदेशातील लाखो पर्यटक जीवाचा गोवा करण्यासाठी आधीच डेरेदाखल झाले होते. या सर्वांनी वर्षअखेरच्या सूर्याला बाय बाय करत जल्लोषपूर्ण पार्टीत सहभागी होत नव्या वर्षाचे अपूर्व उत्साहात स्वागत केले.
फेसाळणाऱ्या किनाऱ्यांची रंगत, तरुणाईला आकर्षित करणाऱ्या पार्ट्यांचा जल्लोष आणि सेलिब्रेशनचा मनसोक्त आनंद देणारा गोवा आता जगभरातील पर्यटकांचे आवडते सेलिब्रेशन डेस्टिनेशन झाला आहे. साहजिकच ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले.
यात सेलिब्रिटी, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, खेळाडू यांचा समावेश होता. इथल्या सप्ततारांकित हॉटेलांपासून रिसॉर्टपर्यंत सर्व ठिकाणी पार्ट्यांची रात्रभर धूम चालली. गेले दोन वर्षे कोरोनामुळे सर्व उत्सवांवर निर्बंध आल्याने या आनंदाला पर्यटक मुकले होते. यंदा मात्र काहीशी मोकळीक मिळाल्याने पर्यटकांनी मनमुराद पर्यटनाचा आणि जल्लोषी वातावरणाचा आनंद लुटला.
न्यू इयरचे सेलिब्रेशन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी राज्यातील हॉटेल व्यावसायिक नेहमीच प्रयत्नशील असतात. यावेळीही बहुतांश हॉटेलांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
नववर्ष सेलिब्रेशन सुरळीत पार पडावे म्हणून गोवा पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज होत्या. संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दहशतवादविरोधी विशेष दल आणि राखीव दलाच्या तुकड्या ठिकठिकानी तैनात करण्यात आल्या होत्या. याशिवाय ड्रग्सविरोधी पथके तैनात केली होती.
वाहतूक आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी वाहतूक सुरळीत ठेवली. तरीही वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मद्य पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पोलिस दल तैनात केल्याची माहिती पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिली.
राज्यातील बहुतांश कॅसिनोंवर 31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. लज्जतदार पदार्थांच्या मेजवानीसह संगीत, नृत्यांच्या मैफलीने पर्यटकांचे मनमुराद मनोरंजन केले. यंदा या पार्ट्यांचं आकर्षण राहिले ते विदेशी डान्सरचे.
रात्री 11.55 पासून काऊंट डाऊनला सुरुवात करत बरोबर 12च्या ठोक्याला नेत्रदीपक आतषबाजीने नृत्याच्या ठेक्यावर नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी परस्परांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबर नववर्ष स्वागताच्या पार्टीत सहभागी होणे, हा पर्यटकांचा बेत असतो. त्याप्रमाणे आज दिवसभर राज्यातील बहुतांश किनाऱ्यांवर फेसाळणाऱ्या लाटांचा आनंद घेत जलक्रीडा करताना दिसत होते.
उत्तर गोव्यातील मिरामार, कळंगुट, बागा, मोरजी, आश्वे-मांद्रे. सिकेरी, कांदोळी, वागातोर या किनाऱ्यांवर तर दक्षिण गोव्यातील कोलवा, वार्का, बाणावली, मोबोर, पाळोळे, या किनाऱ्यांवर पर्यटकांची झुंबड उडालेली होती. काही ठिकाणी पर्यटक वॉटर स्पोर्टसचा आनंद घेत होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व गोमतंकीय जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या वर्षभराच्या अनुभवातून आपण प्रत्येकजण काहीतरी शिकलो. नवे वर्ष हे गोव्याला आणखी विकासाकडे नेणारे असेल. सर्व जनतेच्या आनंद मिळावा तसेच त्यांच्या इच्छा, आकांशा पूर्ण होवोत, असे ते म्हणाले.
नववर्ष स्वागतासाठी जगभरातून लाखो पर्यटक राज्यात वेगवेगळ्या मार्गांनी दाखल झाले होते. त्यामुळे राज्यात एकाचवेळी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने किनारी भागातील बहुतांश वाहतूक मंदावली होती. संध्याकाळी आठनंतर मात्र ही वाहतूक अधिकच मंदावली आणि पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत ही वर्दळ सुरूच होती.
काहींनी राज्यात येण्यासाठी विमान आणि रेल्वेला पसंती दिली. त्यामुळे गेल्या आठवडाभरातील गोव्याकडे येण्याचे प्रवास दर दुप्पट-तिप्पट झाले होते. विमान तिकिटांचे दरही गगनाला भिडले होते. काही विदेशी पर्यटकांनी मोठे क्रूझ आणि चार्टरने गोवा जवळचा केला. स्वत:च्या वाहनाने येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी नव्हती. यंदा या पर्यटकांची संख्या चार ते पाच लाखांपर्यंत गेली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.