Mapusa News: आपला कार्यकाळ हा फक्त एक वर्षाचा आहे, असे सांगत नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी म्हापशाला ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
म्हापसा पालिका मडंळ कामे करण्यासाठी पैसे घेते, हे कथित आरोप त्यांनी फेटाळून लावले. आम्ही कोणीच (लोकप्रतिनिधी) अशा गैरप्रकारात गुंतलेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील नगरपालिकेवर भाजपप्रणीत आघाडीचे वर्चस्व असून सत्ताधारी गटातील प्रिया मिशाळ यांची मंगळवारी नूतन नगराध्यक्ष म्हणून निवड झाली.
मिशाळ यांची नगरसेविका म्हणून पहिलाच कार्यकाळ असून अल्पावधीतच त्यांनी नगराध्यक्षपदापर्यंत मजल मारली. सत्ताधाऱ्यांनी संगीत खुर्चीप्रमाणे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे आपापसात पाच वर्षांसाठी विभागून घेतली आहेत. त्यानुसार हा पहिला बदल झाला आहे.
शहराची प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाल्याने हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आहे. सर्वांना विश्वासात घेऊन म्हापसा शहर स्मार्ट सिटीअंतर्गत आणण्याचा प्रयत्न राहिल.
स्मार्ट सिटी ही भविष्याची योजना आहे, मात्र सध्या शहरवासीयांना पक्के रस्ते व चांगल्या मूलभूत पायाभूत सुविधा देण्यावर अधिक भर राहिल, असेही मिशाळ यांनी सांगितले.
पद स्वीकारल्यानंतर शहरासाठीच्या योजनांबाबत विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शहर स्वच्छतेसह पालिकेतील प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिशाळ म्हणाल्या.
सध्या भूमिगत वीजवाहिन्यांसाठी अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्ते नादुरूस्त झाले असून हे काम तातडीने पूर्ण करुन रस्ते पूर्ववत करण्याकडे लक्ष देणार असल्याचे मिशाळ म्हणाल्या.
शहरात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच कोर्ट जंक्शनवरील ट्रॅफिक सिग्नलचा विषय रखडला आहे, असे विचारले असता त्या म्हणाल्या की या विषयाची विद्यमान स्थिती मला माहिती नाही.
यासंदर्भात माहिती घेऊन उत्तर देऊ शकेन. परंतु या दोन्ही प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल.
जागेचा अभाव...
पणजी, मडगाव यासारख्या शहरांमध्ये बऱ्यापैकी सौंदर्यीकरण केलेल्या जागा किंवा परिसर दिसतात. मात्र म्हापशात तसे क्वचितच सौंदर्यीकरण दिसते.
असा प्रश्न केला असता प्रिया मिशाळ म्हणाल्या की, मुळात शहरात जागेचा अभाव आहे. सर्वत्र गर्दी असल्याने सौंदर्यीकरणासारखे प्रकल्प इथे राबविणे अवघड आहे. तरीही नवीन समित्या स्थापन झाल्यानंतर या विषयांवरही विचारविनिमय होईल.
म्हादई परत हवीच...
म्हादईविषयी प्रश्न केला असता प्रिया मिशाळ म्हणाल्या की, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून ती आम्हाला परत हवी आहे.
म्हादईचे पाणी वळविल्यास त्याचा गोव्यासह पर्यावरणावर विपरित परिणाम होईल. त्यामुळे भाजपा सरकारने कुठल्याही स्थितीत म्हादई नदी गोव्याकडेच राहावी यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.