गोव्यात लवकरच जून महिन्याऐवजी एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊ शकते. गोव्यातील एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) च्या संबंधित झालेल्या चर्चेत नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरु करण्याच्या प्रस्तावावर सध्या विचार केला जातोय.
गोव्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणारे डॉ. प्रमोद सावंत यांचा याबाबत निर्णय अंतिम असेल. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण (Goa Secondary and Higher Secondary Education) मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला असल्याची माहिती दिली आहे.
या प्रस्तावाचा प्रमुख उद्देश गोव्यातील शाळा आणि केंद्रीय शिक्षण मंडळांच्या शैक्षणिक कॅलेंडरमध्ये समानता आणण्याचा आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे पावसाळ्याच्या अनिश्चिततेमुळे शैक्षणिक वर्षात येणारे व्यत्यय रोखण्यासाठी देखील हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. गोव्यात अनेकवेळा अतिवृष्टी आणि पुरासारख्या गंभीर परिस्थितींमुळे अनेक शाळांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना सुट्ट्या द्याव्या लागतात.
मात्र शिक्षण खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या मते मार्च-एप्रिल महिन्यांच्या काळात राज्यात उष्णतेचे प्रमाण अधिक असते आणि कित्येक शाळांमध्ये आजही टीन किंवा पत्र्याचा छत म्हणून वापर केला जातोय, उष्णतेचे प्रमाण अधिक असताना मुलांना अशा ठिकाणी तासंतास बसणं शक्य होणार नाही.
शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी अद्याप या विषयावर भाष्य करण्यास नकार दिलाय मात्र शैक्षणिक मंडळाची चर्चा प्रगत टप्प्यावर सुरु असल्याची पुष्टी केलीये. हा प्रस्ताव जर का खरोखर मान्य झाला तर शाळकरी मुलांना मे महिन्याच्या सुट्ट्यांना कायमचा पूर्णविराम द्यावा लागू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.