

पणजी : उत्तर पश्चिम घाटात राहणाऱ्या जंतूसदृश केशिलियन उभयचर प्राण्याची एक नवी प्रजाती शास्त्रज्ञांच्या चमूने शोधून काढली आहे.
या नव्या प्रजातीला ‘जेनेओफीस वाल्मिकी’ असे नाव देण्यात आले असून, ज्या ठिकाणी ही प्रजाती प्रथम आढळून आली त्या सातारा (महाराष्ट्र) जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पानेरी, पलाशी येथील वाल्मिकी पठारावर असलेल्या ऐतिहासिक महर्षी वाल्मिकी मंदिराच्या नावावरून हे नामकरण करण्यात आले आहे.
या संशोधनाचा वैज्ञानिक लेख भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था, पश्चिम प्रादेशिक केंद्र, पुणे येथील के. पी. दिनेश आणि साहिल शिकलगर; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील प्रांजल आढाव; सातारा येथील बळासाहेब देसाई कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक बापुराव विष्णू जाधव; तसेच गोव्यातील म्हादई संशोधन केंद्राचे निर्मल कुलकर्णी यांच्या संयुक्त लेखनातून प्रसिद्ध झाला आहे.
या शोधाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित असलेल्या फिलोमेडुसा या वैज्ञानिक नियतकालिकाच्या अलीकडील अंकात प्रसिद्ध झाले आहेत.
ही नवी प्रजाती सर्वप्रथम २०१७ साली भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. पी. दिनेश यांनी पाटण तालुक्यातील वाल्मिकी पठार परिसरातून संकलित केली होती. मात्र, सखोल आकारवैज्ञानिक आणि जनुकीय विश्लेषणाद्वारे ती स्वतंत्र व नवी प्रजाती असल्याचे निश्चित होण्यासाठी बराच कालावधी लागल्याचे त्यांनी नमूद केले.
मैदानी परिस्थितीत जेनेओफीस या वंशातील (ज्यांना सामान्यतः ‘आंधळे केशिलियन’ असे म्हटले जाते, कारण त्यांचे डोळे हाडांच्या कवटीखाली लपलेले असतात) प्राणी ओळखणे अत्यंत अवघड असते. हे प्राणी जंतूसारखे दिसत असल्याने वरवर पाहता ते गांडुळांप्रमाणे भासतात.
केशिलियन हे पाय नसलेले, जमिनीखाली राहणारे उभयचर प्राणी असून ते मातीखाली व सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध अशा जमिनीत वास्तव्य करतात.
बेडूकांप्रमाणे आवाज न काढल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष सामना बहुतेक वेळा योगायोगानेच होतो. या सर्व कारणांमुळे भारतात बेडूक प्रजातींच्या तुलनेत केशिलियन प्रजातींचा शोध घेणे अधिक कठीण मानले जाते. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांत जेनेओफीस या वंशातील कोणतीही नवी प्रजाती शोधली गेलेली नव्हती.
पश्चिम घाटात केशिलियनच्या एकूण २६ प्रजाती आढळतात आणि या सर्वच प्रजाती स्थानिक आहेत. त्यापैकी जेनेओफीस या वंशातील ११ प्रजाती पश्चिम घाटात ज्ञात आहेत. केशिलियन प्राणी शेती परिसंस्थेसाठी उपयुक्त मानले जातात.
त्यांच्या जमिनीत बिळे करण्याच्या क्रियेमुळे मातीतील हवा खेळती राहते, मातीची रचना सुधारते आणि ते प्रामुख्याने जमिनीत राहणाऱ्या सूक्ष्म जीवांवर उपजीविका करतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मातीचे आरोग्य आणि सुपीकता वाढण्यास मदत होते.
जेनेओफीस वाल्मिकी या नव्या प्रजातीच्या नोंदीदरम्यान केलेल्या वंशावळी अभ्यासातून उत्तर पश्चिम घाटात अजूनही अनेक नव्या प्रजाती शोधल्या जाण्याची शक्यता असल्याचे डॉ. दिनेश यांनी नमूद केले आहे.
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. धृती बॅनर्जी यांनी सांगितले की, अलीकडील मूल्यमापनानुसार जगातील सुमारे ४१ टक्के उभयचर प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्यात आहेत आणि भारतातील परिस्थितीही तितकीच गंभीर आहे. कशेरुकी प्राण्यांच्या सामूहिक नामशेष होण्याच्या या काळात, पश्चिम घाटातून केशिलियनच्या नव्या प्रजातींचा वेळेत झालेला शोध व दस्तऐवजीकरण हे संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.