पणजी - मूल जन्माला येण्यापूर्वीपासून ते सहा वर्षापर्यंत आणि मुलींच्या बाबतीत, तर सोळा वर्षांपर्यंतची विविध प्रकारची कामे करणाऱ्या राज्यातील अडीच हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या (Anganwadi workers) मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या सुटाव्यात म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेची आंदोलने सुरू आहेत. प्रामुख्याने वेतनवाढ, निवृत्ती वेतन आणि सेवेत कायम करणे (Pay increments, pensions and retention in service) या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष सुनीता मुरगावकर यांनी दिली आहे. राज्यात १२६२ अंगणवाड्या असून ११५४ अंगणवाडी सेविका आणि ११४१ मदतनीस अशा २२९५ कर्मचारी महिला आणि बालकल्याण खात्याकडे कार्यरत आहेत. काही कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने स्थानिक अंगणवाडीचा ताबा जवळच्या सेविकेकडे दिला आहे. अशी २२९ पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांचा स्थानिक पातळीवर चांगला लोकसंपर्क असतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरील सर्वेक्षणाची अनेक कामे या महिलांकडून करून घेतले जातात. स्थानिक नेत्यांची ही कामे करावी लागतात. त्यामुळे कामापेक्षा इतर अनेक कामेच त्यांना जास्त करावे लागतात. पूर्वी समाज कल्याण खात्याकडे कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना आता महिला आणि बालकल्याण विकास खात्याकडे वर्ग केले आहे. त्यांच्याकडून महिला गरोदर झाल्यापासून ते मूल सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचा आहार, पोषण, लसीकरण, वाढ आणि पूर्व प्राथमिक शिक्षण हे करावे लागते. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या योजनेमुळे मुलगी सोळा वर्षाची होईपर्यंत तिच्या संदर्भातली पोषण आहार संबंधीची अनेक कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागतात. मात्र त्यांना मिळणारे मानधन कमीच आहे. वेतनवाढ, निवृत्तिवेतन आणि सेवेत कायम करावे या त्यांच्या मागण्या कायम आहेत याशिवाय कामाचे तास, सेवा समाप्ती लाभ, रजा मंजुरी, अंगणवाडी भाडे, लाईट पाणी भाडे, साहित्य, स्वेच्छानिवृत्ती लाभ अशा स्वरूपाची १८ मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबद्दल त्यांची आंदोलनही सुरू आहे.
सरकारने नवीन वेतन श्रेणी मंजूर केली आहे. मात्र ५ वर्षाखालील सेवा देणाऱ्या सेविकेला ८ हजार ५०० रुपये मिळत होते त्यात १५०० रुपये व १० वर्षांखालील सेविकांना ९ हजार ५०० रुपये मिळत होते. त्यांचे ५०० रुपये वाढवले आहेत. दहा वर्षापर्यंतच्या सर्वांना १० हजार रुपये मानधन केले आहे. ५ वर्षाखालील मदतनीसेला ३ हजार ७५० रुपये मिळत होते त्यात १५०० रुपये तर दहा वर्षाखालील मदतनीसेला ५०० रुपये वाढवून त्यांचे मानधन आता ५७५० रुपये केले आहे. १० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारचे वेतनवाढ दिले नाही. त्यामुळे हे कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस
दहावी पेक्षा जास्त शैक्षणिक अहर्ता असलेले कर्मचारी अंगणवाडी सेविका बनू शकते. ती मुलांचे बौद्धिक ,शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करते. शारीरिक वाढ आणि मुलांच्या आरोग्यावर तिचे लक्ष असणे अपेक्षित आहे. मुलांचे आरोग्य, आहार आणि गुणवत्ता यांचे तपशील राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी दैनंदिन पाठवावे लागतात. याशिवाय अनेक प्रकारचे सर्वेक्षण, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, सहा वर्षांपर्यंतची मुले, १६ वर्षांपर्यंतच्या मुली यांच्या संदर्भातली माहिती मिळवून त्यांचे तपशील नोंद करावे लागतात. त्याशिवाय आहार, साहित्य वाटप ,लसीकरण यातही त्यांना मदत करावी लागते. आता सध्या डी डी एस मार्फत ही दैनंदिन तपशील केंद्र सरकारला पाठवावा लागतो. आठवी पास शैक्षणिक अर्हता पूर्ण असणारी मदतनीस बनू शकते. सेविकेला सर्व प्रकारची मदत करणे, अंगणवाडी मुलांसाठी पोषण आहार शिजवणे, त्याचे वाटप करणे, अंगणवाडी साफसफाई ही कामे तिला करावे लागतात.
नवीन तंत्रज्ञान आणि स्वेच्छा निवृत्ती
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस शिक्षित असल्या तरी त्यांना मोबाइल तंत्रज्ञानाची माहिती नाही. केंद्र सरकारने सारे तपशील मोबाईलच्या क्लिष्ट ॲपद्वारे भरून रोज पाठवावे,अशी अट घातली आहे. त्यामुळे अनेक सेविका स्वेच्छानिवृत्ती मागत आहेत. त्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्ष असल्याने त्यांना स्वेच्छानिवृत्तीचा लाभ मिळत नाही. अनेक ठिकाणी पदे रिक्त आहेत. ती भरली जात नाहीत. निवृत्तिवेतनाची मागणी प्रलंबित आहे. काही सेविकेने १५० रुपये तर मदतनिसांनी ३० रुपये मानधनावर नोकरीला सुरुवात केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.