
Malabar Tree Nymph Butterfly
जंगल क्षेत्राने समृद्ध असणाऱ्या व स्थानिक वृक्षवेलींचा भरणा असलेल्या गोव्यात असंख्य फुलपाखरांचा वावर आहे. २०२१मध्ये गोवा सरकारने आपल्या राज्याची ओळख म्हणून एका फुलपाखराची निवड करून त्याला राजाश्रय प्रदान केलेले आहे.
पांढऱ्या कागदासारखे दिसणारे फुलपाखरू म्हणजे 'मलाबार वृक्ष परी' हे गोव्याचे राज्य फुलपाखरू आहे. या फुलपाखराच्या पंखांचा विस्तार १२ ते १५ सेंटिमीटर इतका असतो. त्याच्या पांढऱ्या पंखांवर काळ्या रेषा व ठिपके असतात.
विशिष्ट झाडे, झुडपे, वेली व इतर वनस्पतींवर फुलपाखरे जन्म घेतात, तर मलाबार वृक्ष परी हे फुलपाखरू फक्त पश्चिम घाटाच्या जंगलात आढळते.
अशा जंगलात नदी ओहोळाच्या खोऱ्यात पदभ्रमण करताना या फुलपाखराचे विविध हावभाव अनुभवायला मिळतात. कारण पश्चिम घाटात पाणथळ जागेत ‘पारसोनसीया’ प्रजातीतील विशिष्ट वेलवर्गीय वनस्पती सापडते.
ही मलाबार वृक्ष परीसाठी जीवनदायिनी वेल आहे. या वेलीच्या खालच्या बाजूला मादी फुलपाखरू अंडी लावते. एका पानाखाली २-३ अशी अंडी लावली जातात. काही आठवड्याने त्या अंड्यातून सुरवंट बाहेर पडतात व ती पाने खायला सुरुवात करतात.
अशा विशिष्ट झाडाची पाने उपलब्ध नसतील तर ती मरून जातात. या सुरवंटांना गोव्यात स्थानिक भाषेत कीड किंवा ‘सुकूंडो’ असे म्हणतात. इतर सुरवंटापेक्षा या सुरवंटाची पाने खाण्याची पद्धत वेगळी आहे. पानाच्या बाहेरील टोकापासून पाने न खाता ती पानाच्या मधोमध जाऊन पाने खातात त्यामुळे पानांची चाळण झालेली दिसते.
सुरवंट जेव्हा मोठी होते तेव्हा ती आकर्षक दिसते. तिच्या शरीरावर काळे व पांढरे पट्टे असतात व दोन्ही बाजूला सरळ रेषेत लाल ठिपके असतात.
ही सुरवंट पानाच्या खालच्या बाजूला चिकटते व आपल्याच शरीराचे घरट्यामध्ये रूपांतर करते. त्याला कोष म्हणतात. तो अगदी चमकदार सोनेरी रंगाचा असतो. एक अचंबित करण्यासारखी गोष्ट म्हणजे या कोषाची लांबी फक्त २ सेंमी इतकीच असते व त्याच्यातून बाहेर पडणारे फुलपाखरू कोषापेक्षा चार पटीने मोठे असते.
सत्तरी तालुक्यातील माळोली गावात नैसर्गिक झऱ्याच्या सभोवताली १४० दशलक्ष वर्षांपूर्वीचे जंगल आहे. त्याला गावातील लोकांनी 'निराकार' देवाच्या नावाने राखून ठेवलेले आहे. सुरवंट विषारी वनस्पती खाते म्हणून फुलपाखरू विषारी बनते. त्यामुळे हे फुलपाखरू सावकाश संथ गतीने उडते.
इथले औषधी गुणधर्मयुक्त पाणी जसे लोकांसाठी जीवनामृत ठरलेले आहे तसे ते मलाबार वृक्ष परीचा नैसर्गिक अधिवास जिवंत ठेवण्यासाठीही कारणीभूत ठरलेले आहे. अशा आल्हाददायक हवामानात, घनदाट वृक्ष आच्छादनात हे फुलपाखरू उंचावर जाऊन गोलाकार घिरट्या घेत, हवेत तरंगताना दिसते.
उंच झाडांच्या काळोखी सावलीत त्याचा पांढरा शुभ्र रंग लक्ष वेधून घेते. पक्षी, सरडे, व इतर भक्षक या फुलपाखराला खात नाहीत कारण ते एक विषारी फुलपाखरू आहे.
सुरवंट विषारी वनस्पती खाते म्हणून फुलपाखरू विषारी बनते. त्यामुळे हे फुलपाखरू सावकाश संथ गतीने उडते. हे फुलपाखरू जरी दुर्मीळ व प्रदेशनिष्ठ असले तरी सत्तरीतील वांते या गावात दोव्हाळ ओहोळाच्या परिसरात पावसाळा संपल्यानंतर या फुलपाखराच्या विणीचा हंगाम पाहायला मिळतो. हे दृश्य तर अविस्मरणीयच आहे.
मादी फुलपाखरू पानावरती बसते व नर फुलपाखरू तिच्यापासून एका हाताच्या अंतरावर हवेत तोल सांभाळत उडतो व तिला आपल्याकडे आकर्षित करतो. ही प्रक्रिया एक तासापर्यंतसुद्धा सुरू असते.
गोव्यातील सत्तरीतील मलपण, धावे, धारबांदोड्यातील पेरिमळ, केपेतील सुळकर्णे, कोलंब, काणकोणतील पैंगीण व गावडोंगरी या भागांत राहणाऱ्या लोकांना या फुलपाखराचे दर्शन घडते. कारण या परिसरात बारमाही वाहणारे झरे व सदाहरित जंगल अस्तित्वात आहे.
उन्हाळ्यात जेव्हा पाणी अत्यल्प होते तेव्हा बोडगिणी या काटेरी झुडपांच्या सान्निध्यात या फुलपाखराचा वावर असतो.त्याच्या शरीरावर हलका पिवळा रंग असतो तर मलाबार वृक्ष परी पूर्णपणे पांढरेशुभ्र असते. दोन्ही फुलपाखरांच्या पंखावरील रचनेत फरक असतो.
मलाबार वृक्ष परी हे गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे सूचक आहे. या फुलपाखराचे शास्त्रीय नाव आहे ‘आयडिया मलाबारीका’. तर याच फुलपाखरासारखे दिसणारे अजून एक फुलपाखरू आहे त्याचे शास्त्रीय नाव आहे ‘आयडिया ल्यूकोनो’. त्याला ‘पेपर काईट’ असे म्हणतात.
त्याच्या शरीरावर हलका पिवळा रंग असतो तर मलाबार वृक्ष परी पूर्णपणे पांढरेशुभ्र असते. दोन्ही फुलपाखरांच्या पंखावरील रचनेत फरक असतो. फुलपाखरांचे विश्व हे खूपच विलोभनीय असते.
त्यांची आयुर्मर्यादा अल्प असली तरी त्यांचे जीवनचक्र आपणाला अचंबित करते. ‘मलय वृक्ष परी’ असे या फुलपाखराला प्राणिशास्त्राप्रमाणे प्रदेशनिष्ठ असे नाव दिलेले आहे. त्याला कारण हे फुलपाखरू भारतातल्या मलय पर्वतरांगेतल्या जंगलात आणि त्याच्याशी सलग असलेल्या सदाहरित वृक्ष वेलींच्या सान्निध्यात आढळते.
सत्तरीतील ब्रह्माकरमळी या गावात बऱ्याच पाणथळीच्या आणि सदाहरित जंगलाची समृद्ध जागा असून इथल्या उंच उंच वृक्षांच्या पर्ण आच्छादनात हे विमुक्तपणे विहार करणारे फुलपाखरू आपले लक्ष चटकन वेधून घेते.
उंच भरारी घेतल्यानंतरच हे फुलपाखरू आपले पंख सरळ रेषेत ठेवून विहार करण्यास प्राधान्य देते. त्याचा विहार पाहणे म्हणजेच निसर्गातला अद्भुत आविष्कार. गोवा सरकारने राज्य वृक्ष म्हणून माडतीला (आईन) , राज्य पक्षी म्हणून पिवळ्या रंगांच्या अग्निशिखा बुलबुलला सन्मान दिलेला आहे, तर गव्याला राज्य प्राण्याचा दर्जा प्रदान केलेला आहे.
याच यादीत एका फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून सन्मानित करणे हा केवळ त्या प्रजातीचा गौरव नसून गोव्यात दुर्मीळ होत चाललेले सदाहरित जंगलाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे.
गोव्यातील जंगल पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात फुलपाखरांच्या प्रजातीची पैदाईश होण्यासाठी अत्यंत पोषक असते आणि त्यामुळे या मौसमात फुलपाखरांचे दर्शन घडत असते. या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यामागे त्याचे केवळ देखणेपण महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा त्याच्या अधिवासाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
नीलपरी, पिवळी पाकोळी अशी फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर भिरभिरताना आपल्या बागेत किंवा सर्व सामान्य जंगलात दृष्टीत पडतात या तुलनेत गोवा सरकारने अधिसूचित केलेले फुलपाखरू हे मोजक्या नैसर्गिक अधिवासात आढळते.
पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्यात ज्या ज्या ठिकाणी सदाहरित जंगलांत पाणथळीच्या जागा आहेत तेथेच या फुलपाखराचे वास्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने या फुलपाखराची लाल यादीत नोंद करून त्याचे जीवन संकटग्रस्त असल्याचा संदेश दिला आहे.
हे फुलपाखरू जेथे वावर करत असते ते जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. विकासाचे मोठ मोठे प्रकल्प उभे राहत आहेत आणि त्यामुळे जंगलतोड करून विकासाचे प्रकल्प पुढे रेटले जातात. सदाहरित जंगलाने समृद्ध प्रदेशाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे समस्त गोमंतकीयांच्या दृष्टीने गरजेचे आहे. - अॅड. सूरज मळिक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.