Mangor Hill: मंदिरे, चर्चकडे जाणारी वाहने नौदलाने अडवली! वरुणापुरी-मांगोरहिल येथे भाविक नाराज; MLA साळकर यांच्याकडून मध्यस्थी
वास्को: वरुणापुरी - मांगोरहिल येथील राम मंदिर, काली मंदिर व सेंट मेरीज ऑर्थोडॉक्स सिरियन चर्चकडे वाहने नेण्यासाठी नौदलाने प्रतिबंध केल्याने भाविकांनी व स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी संबंधितांनी वास्कोचे आमदार दाजी साळकर यांना माहिती दिल्यावर त्यांनी तेथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
जोपर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी यासंबंधी चर्चा होत नाही, तोपर्यंत तेथे वाहने उभी करण्यास प्रतिबंध करू नये, अशी विनंती त्यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांना केली व त्यांनी ती मान्य केली. या प्रकरणी सुवर्णमध्य तोडगा काढण्याचे प्रयत्न असल्याचे साळकर यांनी स्पष्ट केले, तर या प्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी भाविक, रहिवाशांनी केली आहे.
वरुणापुरी - मांगोरहिल येथे गेल्या ५०-६० वर्षांपासून ही धार्मिक स्थळे आहेत. तेथे नियमितपणे प्रार्थना, आरत्या व इतर धार्मिक कार्ये होतात. आत्तापर्यंत तेथे कोणतीही अडचण आली नाही.
तथापी, १५ जून रोजी नौदलाने अचानकपणे या धार्मिक स्थळांपर्यंत वाहने नेण्यास प्रतिबंध घातला. तुम्ही वाहने आत न आणता, महामार्गावर उभी करा असे नौसेनिकांनी सांगितले. त्यामुळे तेथे असंतोष पसरला.
या प्रकरणी आमदार साळकर यांना त्वरित माहिती देण्यात आल्यावर त्यांनी नौदलाच्या गोवा ध्वजाधिकाऱ्याकडे संपर्क साधून त्यांच्यासमोर विषय मांडला. ध्वजाधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी तेथे येऊन पाहणी केली.
तथापी, या प्रकरणी योग्य तोडगा काढण्याची गरज भाविकांनी व्यक्त केली आहे. पाहिजे तर नौदलाने तेथे बूथ उभारावे, वाहनांची तेथे तपासणी करावी, संबंधित वाहनांचा क्रमांक नोंद करावा, वाहनचालकांचा मोबाईल क्रमांक घ्यावा अशी सूचना करण्यात आली.
‘नौदलाच्या निर्णयामुळे भाविकांना त्रास’
या प्रकरणी साळकर यांनी बुधवारी पुन्हा पाहणी केली. त्यांनी तेथील भाविकांचे, देवस्थान समिती, चर्च समिती पदाधिकारी व इतरांची बाजू ऐकली. याप्रसंगी राम मंदिराचे पदाधिकारी शैलेंद्र तिवारी यांनी हे मंदिर ६० वर्षांपासून तेथे आहे. तेव्हा नौदलाच्या इमारतीही तेथे नव्हत्या. आता अचानकपणे नौदलाने जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना त्रास होणार आहे, असे सांगितले.
‘स्थानिकांना विश्वासात घेऊन तोडगा काढावा’
साळकर यांनीही सदर भाग नौदलाचा ऑपरेशन क्षेत्र नसून,तेथे सिव्हील क्षेत्र असल्याचे स्पष्ट केले. तेथे नौदलाच्या ज्या दोन इमारती आहेत,त्यामध्ये सध्या कोणीच राहत नाही. त्या इमारतींसंबंधी अभ्यास करून त्या गोवा सरकारतर्फे ताब्यात घेण्यात याव्यात व नौदलाला त्या बदल्यात दुसरीकडे जागा देण्यात यावी हा प्रस्ताव मांडणार येणार असल्याचे ते म्हणाले. नौदलाने सुरक्षाच्या द्दष्टीने आवश्यक पाऊले उचलावीत. तथापी हा भाग नागरी वस्तीचा आहे. त्यामुळे तेथे प्रतिबंध करणे गरजेचे नाही. नौदलाने स्थानिकांना विश्र्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्याची गरज आहे. आम्ही नौदलाला नेहमी मानसन्मान देत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
‘नौदलाचा निर्णय अयोग्य’
विश्र्व हिंदू परिषदेचे श्याम नायक यांनीही नौदलाने जो निर्णय घेतला आहे तो योग्य नसल्याचे सांगितले. महामार्गावर दूरवर वाहने उभी करून मंदिर, चर्चपर्यंत चालत येणे ज्येष्ठ भाविकांना त्रासदायक ठरणार आहे. तेथे नौदलाच्या दोन निवासी इमारती असून त्यांची दुर्दशा झाल्याने तेथे कोणीच राहत नाही. मंदिर, चर्चकडे जाणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो. त्यावर नौदल आपला अधिकार कसा सांगू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नौदलाने जैसे थे स्थिती ठेवावी, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.