'दसरा, दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा', असं या दोन्ही सणांचे मोठेपण सांगणारी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. दसरा महाराष्ट्र, गोव्यासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी साजरा केला जातो. मात्र, दिवाळी हा सण देशात सर्वदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीला (Diwali) गोडधोड फराळ करण्याची मोठी प्रथा आहे. तसेच, महाराष्ट्रात दिवाळी म्हटलं की किल्ले बनवून त्यावर शिवकालीन सैनिकं मांडली जातात. तसेच, गोव्यात दिवाळीपूर्व नरकासुर दहन (Narkasur In Goa) ही एक मोठी परंपरा आहे. नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती आणि जल्लोषात निघणारी भव्य मिरवणूक काढून पहाटे नरकासुराचे दहन केले जाते. नरकासुर दहन केल्यानंतर सकाळी विविध प्रकारचे पोहे करून खाल्ले जातात आणि नंतरच गोव्यात खऱ्या अर्थानं दिवाळीला सुरूवात होते.
श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. गोव्यात नरक चतुर्दशी उत्साहात साजरी केली जाते. गोव्यात सर्वच सण उत्साहात आणि पांरपारिक पद्धतीने साजरे होतात. पूर्वापार चालत आलेल्या प्रथा येथील लोकांनी आजवर जिंवत ठेवल्या आहेत. त्याचपैकी नरकासुर दहन ही एक प्रथा आहे. गोव्यात चौकाचौकात अक्राळविक्राळ स्वरूपातील नरकासुराच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. आजकाल याच्या स्पर्धा भरवल्या जातात. पणजी, मडगाव, फोंडा, म्हापसा, साखली यासह विविध ठिकाणी मोठ्या बक्षीसाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. राज्यात जवळपास 400 ते 500 नरकासुर बनविले जातात. यावर्षी ती संख्या हजाराच्या जवळ पोहचण्याची शक्यता आहे. 25 ते 40 मीटर उंचीच्या हे भलेमोठे नरकासुर बनवताना युवकांचा कस लागतो. (Diwali And Narkasur In Goa)
हिंदूच नव्हे कॅथलिक, मुस्लिमही बनवतात नरकासुर
गोव्यात भात शेतीच्या उरलेल्या तणातून नरकासुराची प्रतिमा तयार केली जायची. अलिकडे कागदाचे लगदे, पालापाचोळा आणि विविध साहित्य नरकासुर बनविण्यासाठी वापरले जाते. युवा पिढी दसऱ्यानंतर अगदी पछाडल्यागत नरकासुर तयार करण्यासाठी झटत असतात. मुख्यत: रात्रीच्या वेळी नरकासुर बनविण्याची प्रक्रिया सुरू असते. गोव्यातील प्रत्येक चौकात नरकासुराच्या आक्राळविक्राळ प्रतिमा पाहायला मिळतील. नरकासुराचा चेहरा जेवढा भयावह आणि बिभत्स करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जातो. बक्षीस कुणाला मिळणार हे त्यावरच अवलंबून असते.
या स्पर्धेला गोव्यात व्यापक स्वरूप आल्यामुळे नरकासुराच्या या शर्यतीत फक्त हिंदूच नव्हे तर कॅथलिक, मुस्लिम तरूण देखील सहभागी होऊ लागले आहेत.
पाच प्रकारचे गोमंतकीय पोहे (फोव)
दिवाळीत विविध प्रकारचे फराळ केले जाते. गोव्यात मात्र, पाच प्रकारचे पोहे केले जातात त्याला गोव्यात 'फोव' असे म्हणतात. पहाटे नरकासुराचे दहन केल्यानंतर सर्वजण या 'फोव'चा फराळ करतात. पाकातले फोव, रोसा फोव, गोडाचे फोव, तिखशे फोव, ताकाचे फोव, कडीचे फोव, फोण्णे फोव, फोंवा खीर आणि फोवा चिवडो अशा प्रकारचे पोहे गोव्यात पाहायला मिळतात. त्यापैकी किमान पाच पोहे नरक चतुर्दशीला हामखास केले जातात. बाकी वर्षभरात कधी घरात पोहे पाहायला मिळणार नाहीत.
भव्य मिरवणूक, डिजे, विद्युत रोषणाई आणि हाजारो पर्यटक
गोव्यातील नरकासुर दहनाची परंपरा एकमेव आणि खास असते. (Unique Narkasur Festival In Goa) या नरकासुराचे आकर्षकण देशी विदेशी पर्यटकांना असते, त्यामुळे हाजारो पर्यटक हा धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी गोव्यात दाखल होतात. नरकासुर दहनापूर्वी नरकासुराची भव्य मिरणूक काढली जाते. यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते सोबतीला डिजे आणि मोठ्या प्रमाणावर युवा सहभागी होत असतात. नरक चतुर्थी दिवशी संपूर्ण रात्रभर हा मिरवणूकीचा कार्यक्रम सुरू असतो. काही ठिकाणी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर तर, काही ठिकाणी पहाटे नरकासुराचे दहन केले जाते.
नरकासुर म्हणजे वाईट प्रवृत्तींचे प्रतिक, त्याचा विनाश करणे म्हणजे वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवणे असा समज आहे. एकदा नरकासुराचे दहन झाले झाले की, घरोघरी दिवे लावले जातात. एका अर्थानं प्रकाशाचे स्वागत केले जाते. त्यानंतर सर्वजण घरात केलेल्या विविध 'फोव' या विशेष फराळाचा आस्वाद घेतात.
Edited By - Pramod Yadav
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.