Goa Crime : दुसरीही मुलगीच झाली म्‍हणून चिमुकल्या जियाचा खून!

लाटण्याने मारझोड केल्याचं उघड; कोलवाळ पोलिसांकडून आई-वडिलांना अटक
Murder of Baby Girl
Murder of Baby GirlDainik Gomantak

Goa Crime : दुसरी मुलगीच झाल्याने जन्मदात्याच आई-वडिलाने आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीची लाटण्याच्या साहाय्याने मारझोड करीत, निर्दयी हत्त्या केल्याची हृदयद्रावक घटना शिरसई परिसरात घडली आहे.

हा धक्कादायक प्रकार, कपेलवाडा-शिरसई येथील एका भाड्याच्या घरात घडला. या खूनप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयित आई आर्मिंदा फर्नांडिस (वय 32) व वडिल सुदन गोंडलेकर (वय 42) या दांपत्यास अटक केली आहे. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बार्देश तालुका हादरला. या दोघांनी अद्याप आपला गुन्हा कबुल केलेला नाही.

कोलवाळ पोलिसांच्या माहितीनुसार, जिया गोंडलेकर असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी (ता. 13) रात्रीच हा प्रकार घडला होता. त्यानंतर मध्यरात्री 3.30 च्या सुमारास संशयित वडिलाने मृत चिमुकलीस दुचाकीवरून (बास्केटमध्ये घालून) नेत कोलवाळ पोलिस स्थानक गाठले. हा प्रकार पाहून ड्युटीवरील पोलिससुद्धा थक्क झाले. पोलिसांनी तत्काळ चिमुकलीला म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू आधीच झाल्याचे जाहीर केले.

चिमुकलीच्या या कथित खूनप्रकरणात संशयाची पहिली सुई ही आई-वडिलांवरच गेल्याने कोलवाळ पोलिसांनी या जोडप्याला सकाळीच ताब्यात घेतले. सकाळपासून या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. मात्र, चौकशीवेळी हे कथित जोडपे आपले जबाब वारंवार बदलत होते. याशिवाय दोघेही एकमेकांचे रक्षण करीत कुणालाच थेट दोष देत नव्हते.

दरम्यान, हे जोडपे स्थानिक थिवीमधीलच असून ते कपेलवाडा-शिरसई येथील एका भाड्याच्या घरात मागील तीन वर्षांपासून राहत होते. त्यांना आणखी एक दोन वर्षांची मुलगी आहे. मात्र, घटनेच्या दिवशी ती घरी नव्हती. ती सध्या संशयित सुदनच्या आईकडे कान्सा-थिवी येथील मूळ घरात असते.

या घटनेची माहिती मिळताच, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी उपअधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक प्रशांत सांगोडकर, मंदार नाईक, कुणाल नाईक व महिला पोलिस उपनिरीक्षक सोनम वेरेकर यांच्यासोबत हा कथित हत्येचा प्रकार घडलेल्या घराला भेट दिली. पोलिसांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांच्या पथकासह या घराचा पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक हे करीत आहेत.

मोठ्या मुलीलाही आईकडून त्रास

संशयित सुदन व आर्मिंदा या दोघांचा आंतरधर्मीय विवाह मागील तीन वर्षांपूर्वीच झाला होता. यानंतर काही महिन्यांतच दोघेही सुदनच्या कुटुंबीयांकडून फारकत घेत ते शिरसई येथील भाड्याच्या घरात राहत होते. या जोडप्यास दोन वर्षांची मोठी मुलगी आहे. मात्र, आई आर्मिंदा ही या मुलीस त्रास करीत असल्याने सुदनने तिला कान्सा येथील आपल्या आईकडे ठेवले होते. 10 मार्चला जिया झाल्यापासून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. मुलगी झाल्यानेच दोघेही निराश होते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

कथित भांडणात जियाची हत्या केल्यानंतर आई-वडील दोघेही अस्वस्थ होते. सुरवातीला ही बाब कुणासमोर कथन करायची नाही व जियाच्या मृतदेहाची गुपचूप विल्हेवाट लावण्यापर्यंत दोघेही पोहचले होते. यासाठी आई आर्मिंदा ही सुदनला तसे करण्यासाठी दबाव टाकत होती. मात्र, धाडस न झाल्याने सुदनने माघार घेतली. त्यानंतर सुदन हा स्वतः मृत जियाला सोबत घेत पोलिस स्थानक गाठले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मृतदेहाची गोमेकॉत करणार वैद्यकीय तपासणी

मृत जियाच्या अंगावर अनेक मारहाणीच्या जखमा आहेत. जियाचा मृतदेह सध्या गोमेकॉत ठेवला असून सोमवारी 15 ऑगस्ट रोजी तिच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत चिमुकलीचे वडील हे पाडेली (नारळ काढणारे) असून आई गृहिणी आहे. मृत जियाच्या हत्त्येसाठी वापरलेले लाटणे कोलवाळ पोलिसांनी जप्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com