

कुडाळ: मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका थरारक घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरून गेला आहे. 'ब्लू डार्ट' या कंपनीचे कुरिअर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला लुटण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी पाठलाग केला. मात्र, चालकाच्या धाडसामुळे हा प्रयत्न फसला असून, या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपींच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
समोर आलेल्या माहितीनूसार, मंगळवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना पणदूर परिसरात घडली. मनोज कुमार पाल (वय ३१, रा. उत्तर प्रदेश) हे आपल्या ताब्यातील कुरिअर कंटेनर घेऊन गोव्याच्या दिशेने जात होते. यावेळी एका कारमधून आलेल्या सहा जणांनी या कंटेनरला अडवण्याचा प्रयत्न केला.
चालकाने गाडी न थांबवता वेग वाढवला. यामुळे संतापलेल्या आरोपींनी चालत्या कंटेनरवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. जिवाच्या भीतीने चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर सुरक्षित ठिकाणी नेला, ज्यामुळे मोठी लूट टळली.
कंटेनर चालकाने दाद न दिल्याने आरोपींनी तिथून पळ काढला. मात्र, कुडाळ शहरात येताच भरधाव वेगातील त्यांच्या कारने नियंत्रण गमावले आणि 'गीता हॉटेल'समोरील एका दुकानाला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, दुकानाचे आणि जवळच असलेल्या जिल्हा बँकेच्या एटीएम केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका कारलाही या धडकेचा फटका बसला. अपघाताच्या आवाजाने स्थानिक नागरिक जमा झाले, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी कंटेनर चालक मनोज कुमार पाल यांच्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. महामार्गावर वाढत्या गुन्हेगारीमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.