डिचोली : नवीन शैक्षणिक वर्षाला दिमाखात सुरुवात होऊन एक आठवडा पूर्ण झाला असला तरी डिचोलीतील काही शाळांमध्ये गैरसोयी आहेत. मुळगावमधील बागवाडा सरकारी प्राथमिक शाळेच्या कोसळलेल्या सिलिंगची चक्क दुरुस्तीच करण्यात आलेली नाही. एका खोलीचे सिलिंग कोसळल्यास पावणे तीन वर्षे उलटली आहेत. मात्र त्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोसळलेल्या सिलिंगचे अवशेष मात्र अजूनही शाळेतच पडून आहेत. आधीच ही इमारत कमकुवत. त्यातच सिलिंगची दुरुस्ती करण्याकडे झालेले दुर्लक्ष, यामुळे शाळा इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे पालक नाराज आणि चिंताग्रस्त बनले आहेत. एका बाजूने आवश्यक त्या साधनसुविधा उपलब्ध करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याचे सरकारचे ध्येय आहे; तर दुसऱ्या बाजूने मुळगावमधील बागवाडा शाळेच्या देखभालीकडे शिक्षण खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, अशी पालकांची तक्रार आहे.
बागवाडा सरकारी शाळेला मोठा इतिहास असून, ही शाळा मुळगावमधील पहिली शाळा आहे. शाळेची इमारत जवळपास 60 वर्षांपूर्वीची आहे. बागवाडा प्राथमिक शाळेतून शिकलेले अनेकजण आज उच्च पदावर आहेत. शाळेची इमारत कमकुवत असल्याने पालकांना भीती वाटत असली तरी मुलांना शाळेत घालताना याच शाळेची निवड केली जाते. चालू शैक्षणिक वर्षासाठी या शाळेत 27 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र या शाळेच्या देखभालीकडे आवश्यक त्यादृष्टीने लक्ष देण्यात येत नाहीत, अशी पालकांची तक्रार आहे.
बागवाडा शाळेच्या इमारतीत कार्यालय होते, त्या खोलीत सिलिंग कोसळल्यास तीन वर्षे पूर्ण होत आली आहेत. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी कार्यालयात कोणीच नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला होता. सिलिंग कोसळल्यानंतर त्याची दुरुस्ती होणार, अशी पालकांची अपेक्षा होती. मात्र दुरुस्ती सोडाच, उलट सिलिंगचे तुकडे आणि अन्य अवशेष अजूनही त्या खोलीतच पडून आहेत. कोविडमुळे दोन वर्षे शाळा धड सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र आता शाळा सुरू झाल्यानंतर हा हलगर्जीपणा लक्षात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदने देऊनही कार्यवाही झालेली नाही, अशी खंत स्थानिक नागरिक तथा जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या शाळेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शाळेची सध्याची अवस्था वाईट आहे, असे सांगून इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी मुळगावचे सरपंच गजानन मांद्रेकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.