
Mulgao Mining Meeting Updates
डिचोली: खाणीच्या विषयावर मुळगावात पेटलेले आंदोलन अजून शांत झालेले नाही. मात्र आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत खाण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भूमिका पाहता, हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे. ‘हवा तेवढा वेळ घ्या, परंतु गावाच्या अस्तित्वाचा गांभीर्याने विचार करून मागण्यांबाबत कायदेशीर पद्धतीने लेखी आश्वासन द्या आणि नंतरच खाण सुरू करा’ असा मुद्दा मुळगावच्या लोकांनी बैठकीत लावून धरला.
याप्रश्नी सकारात्मक तोडगा काढण्याची तयारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवली आहे. सर्वमान्य निर्णय होईपर्यंत खाण बंद ठेवा, असा मागणीवजा इशारा मुळगावच्या लोकांनी दिला आहे.
खाण प्रश्नावरून आक्रमक झालेल्या मुळगावच्या लोकांनी काल खाणीवर धडक देत तेथील कामकाज रोखून धरले होते. या पार्श्वभूमीवर आज ‘वेदान्ता’चे अधिकारी आणि मुळगावचे ग्रामस्थ यांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीस कंपनीचे मुख्य कार्यकारी उपअधिकारी धीरजकुमार जगदीश, खाण व्यवस्थापक संतोष मांद्रेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुळगावच्या श्री केळबाई मंदिरात पार पडलेल्या या बैठकीस पंचायत मंडळासह मुळगावचे ग्रामस्थही मोठ्या संख्येने हजर होते. या बैठकीत ‘मागण्यांची पूर्तता अगोदर करा आणि मगच खाण सुरू करा’ अशी मागणी सरपंच मानसी कवठणकर यांनी केली.
१) मुळगावमधील मंदिरांसह घरेदारे, शेती-बागायती, तळी आणि अन्य नैसर्गिक जलसंपदा खाण लीज क्षेत्रातून वगळा.
२) बफर झोन निश्चित करा.
३) गावाचे नैसर्गिक वैभव जपताना तळ्यांचे संवर्धन करा.
४) रात्रपाळीचे कामकाज बंद ठेवा.
५) पडीक पडलेल्या शेतीतील गाळ उपसतानाच शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाई द्या.
६) रोजगारात स्थानिकांना प्राधान्य द्या.
७) ‘सेझा’ने कामावरून कमी केलेल्या कामगारांचा प्रश्न सोडवा.
८) खाण व्यवसायामुळे भविष्यात गावावर कोणतीही आपत्ती ओढवणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.