Goa Mining: शिरगाव खाण ब्लॉकअंतर्गतच्या शिरगाव खाणीचे भवितव्य जनसुनावणी नंतर स्पष्ट होणार आहे. या खाणीला पर्यावरणीय दाखला मिळविण्यासाठी आज जनसुनावणीला सुरूवात झाली असून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर येते. स्थानिक पंचायतीसह बहुतांश नागरिक खाणीच्या समर्थनार्थ आहेत.
वाठादेव-डिचोली येथील नारायण झांट्ये महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात ही जनसुनावणी निश्चित करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणीला सुरूवात झाली असून सुरक्षा यंत्रणाही कडक आहे.
शिरगाव खाण ब्लॉक 95.6712 हेक्टर क्षेत्रफळात व्यापलेला आहे. प्रतिवर्ष 0.5 मिलियन टन खनिज उत्पादन करण्यासाठी शिरगाव येथील खाणीला पर्यावरणीय दाखला आवश्यक आहे. त्यासाठी ही जनसुनावणी पार पडत आहे.
खाण लीज क्षेत्र आदी काही मुद्दे अलीकडेच ऐरणीवर आले असले तरी शिरगावमधील बहुतांश नागरिकांना खाण व्यवसाय सुरू झालेला हवा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरून खाणीला मोठासा विरोध होत नाही आहे.
खाणीच्या समर्थनार्थ शिरगाववासीयांनी सह्यांची मोहीम राबवली असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे. तरीसुद्धा पर्यावरणप्रेमी आणि खाणविरोधक काही मुद्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यावरण आघात मूल्यांकन (ईआयए) अहवालाच्या सादरीकरणानंतरच शिरगाव खाणीचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
मोठा पोलिस फौजफाटा तैनात
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नारायण झांट्ये महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहातच डिचोली खाण ब्लॉक अंतर्गतच्या खाणीसाठी जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी प्रचंड गर्दी उसळली होती. म्हणूनच आजच्या जनसुनावणी दरम्यान, सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. जनसुनावणीस्थळी मोठ्या पोलिस फौजफाट्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.