पणजी: मुरगाव आणि सासष्टी तालुक्यातील कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी वेर्णा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली जाणार असून, त्या प्रकल्पातून वीज निर्मितीही होणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गुरूवारी सभागृहात दिली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सूचना कपात या सत्रात महसूल, कचरा व्यवस्थापन व कामगार खात्यांबाबत आमदारांकडून आलेल्या सूचनांवर मोन्सेरात यांनी स्पष्टीकरण दिले. (Mormugao Salcete's garbage problem will be solved- Babush Monserrate )
बाबूश म्हणाले की, मुंडकार आणि कुळांचे दावे निकाली काढण्यासाठी आपण जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना स्पष्ट सूचना केल्या आहेत. राज्यातील मूंडकारांचा प्रश्न सहा महिने ते एक वर्षांत सोडविला जाईल. शेतकऱ्यांविषयी असलेल्या सनदीचा विषय हा 60 दिवसांत निकालात काढला जाईल. महसूल खात्याला सर्व कर्मचारी पुरवले जातील, त्यातून हे काम लवकर होईल. लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवा उत्तर गोवा जिल्हाधिकारी इमारत मेरशी येथे उभारली आहे. मुरगाव तालुका प्रशासकीय इमारतही उभारली जाणार आहे. त्याशिवाय फोंड्याचे उपजिल्हाधिकारी कार्यालय दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग चांगला काम करीत आहे. त्यासाठी मागील काही दिवसांत या क्षेत्रातील अग्निशामक दल या घटकाने चांगले काम केले आहे. 315 आपदा मित्र प्रशिक्षण दिले असून, त्यांना सर्व सुविधा पुरविल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा सतत अद्ययावत केला जात आहे. जुने रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी मॉडर्न रेकॉर्ड रूमसाठी महसूल खात्याने 1.43 कोटींची तरतूद केलेली आहे. म्युटेशन आणि विभाजनाची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.