
वास्को : सडा येथील विनावापर उपकारागृहामागे पाच टँकरमधील इंधन चोरणाऱ्या दहाजणांना मुरगाव पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३०) अटक केली. संशयितांनी इंडियन ऑईल कंपनीच्या टँकरमधील सुमारे १ लाख ७८ हजार रुपये किमतीचे इंधन चोरले. विशेष म्हणजे, या चोरीत पाच टँकरचालकांचाही हात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच इंधनवाहू टँकर, तीन मालवाहू वाहने आणि रोख रक्कम अशी सुमारे २२ लाख ३९ हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सडा उपकारागृहामागे टँकरमधील इंधन चोरण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार ब्रिटो मायकल राज (वय ४९ वर्षे, रा. वास्को), मुत्तापा कानगिरी (वय ४७ वर्षे, रा. दाबोळी), मोहन पाटील (वय ५० वर्षे, रा. दाबोळी), बबलू पटेल (वय २२ वर्षे, रा. दाबोळी), गुलाब पटेल (वय ४९ वर्षे, रा. दाबोळी), नीरज पटेल (वय २२ वर्षे, रा. दाबोळी), उमेश कुमार (वय ३२ वर्षे रा. दाबोळी), रामनयन पटेल (वय २८ वर्षे, रा. दाबोळी), सूरज जैस्वाल (वय २७ वर्षे, रा. वास्को), विठ्ठल मेत्री (वय ४० वर्षे, रा. नावेली) यांचा समावेश आहे.
यापूर्वीही मुरगाव तालुक्यात अशा प्रकारे इंधन चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र, इंधन चोरीचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. यापूर्वी डिसेंबर २४ मध्ये मांगोरहिल येथे महामार्गाकडेला टँकर उभे करून त्यातून विमानासाठी लागणारे इंधन चोरीप्रकरणी काहीजणांना सीबीआयने पकडले होते.
टँकरमधील १ लाख ७८ हजार रुपयांचे डिझेल चोरून ते रिक्षातून नेण्यात येत होते. त्यामुळे स्फोटक पदार्थांची वाहतूक करून मानवी जीवनाला धोका निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात भारतीय न्यास संहितेनुसार तसेच पेट्रोलियम कायदा १९३४ च्या कलम २३ नुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक स्टॅन्ली गोम्स अधिक तपास करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.