वास्को: वास्को भाजी मार्केटमधील फळ - भाजी विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात मुरगाव नगरपालिकेने धडक कारवाई करून तीस हजार रुपयाचा माल जप्त केला. पालिकेने भाजी विक्रेत्यांना अनेक वेळा अतिक्रमण न करण्याची समज दिली होती. परंतु फळ -भाजी विक्रेत्यांवर यांचा काहीच उपयोग होत नसल्याने, अखेर पालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाई करून जप्त केला. हा माल लहान मुलांच्या बोर्डींगला दान केला. तर अतिक्रमण हटविल्याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
( Mormugao Municipality Action against Vasco vegetable market encroachment )
मुरगाव नगरपालिकेच्या वास्को भाजी मार्केट मधील फळ -भाजी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केल्याची बातमी ' गोमन्तक ' वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच , पालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स , उपनगराध्यक्ष अमय चोपडेकर ,लेखा प्रशासकिय अधिकारी उदय वाडकर, पालिका निरीक्षक विभय फळदेसाय, सेबेस्तांव परेरा, सचिन पडवळ, भाजी मार्केट व्यवस्थापन समितीचे प्रमुख विनोद किनळेकर, नगरसेवक नारायण बोरकर, वास्को पोलिस उपनिरीक्षक मयुर सावंत, हवालदार संतोष भटकर, शिपाई गौरेश सातार्डेकर, शेखर राऊत व इतर अधिकाऱ्यांनी कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून वास्को भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय रस्त्यावर मांडल्यामुळे ग्राहकांना मार्केटमध्ये फिरकण्यास त्रास सहन करावा लागत होता. याविषयी पालिकेने अनेकवेळा भाजी विक्रेत्यांना समज देऊन सुद्धा यांचा विक्रेत्यांवर कोणताच परिणाम होत नसल्याने, शेवटी पालिकेने मंगळवार(दि.29 ) सकाळी धडक कारवाई करून रस्त्यावर ठाण मांडून बेकायदेशीर व्यवसाय करीत असलेल्यांचा माल जप्त केला.
वास्को भाजी मार्केटमध्ये यापूढेही पालिकेची अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स यांनी दिली. भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय दुकानातून प्रामाणिकपणे केल्यास यांचा फायदा ग्राहकांबरोबर भाजी विक्रेत्यांना होईल. मात्र येथील भाजी विक्रेत्यांना आपला व्यवसाय रस्त्यावर थाटून करण्याची सवय झाली आहे.
भाजी विक्रेत्यांची मनमानी यापुढे पालिका सहन करणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष रॉड्रिगीस यांनी दिली. भाजी मार्केट व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा नगरसेवक विनोद किनळेकर यांनी सांगितले की, भाजी व्यवसायिकांनी आपली मर्यादा ओलांडू नये, तसेच ग्राहकांना कोणताही त्रास होऊ लागल्यास कारवाई ही होणारच. यासाठी फळ - भाजी विक्रेत्यांनी पालिकेबरोबर सामान्य जनतेला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यापुढे भाजी मार्केट मध्ये अतिक्रमण केल्यास मोठी कारवाई करण्यात येईल अशी माहिती नगरसेवक किनळेकर यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.