
वास्को: मुरगाव पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २५ ऐवजी २७ प्रभाग होणार असल्याने काही इच्छुक उमेदवार तसेच विद्यमान नगरसेवकांच्या धावपळीला काहीसा ब्रेक लागला आहे. सीमांकन झाल्यावरच प्रभागांची रचना स्पष्ट होणार आहे. काहीजणांनी दोन प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले आहेत. तथापि, सीमांकनावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
मुरगावच्या २५ पैकी एक ते नऊ प्रभाग मुरगाव मतदारसंघात आहेत. दहा ते २१ असे १२ प्रभाग वास्को मतदारसंघात, तर २२ ते २५ असे चार प्रभाग दाबोळी मतदारसंघात आहेत. गत निवडणुकीत मुरगाव मतदारसंघातून तत्कालीन मंत्री मिलिंद नाईक यांचे सात समर्थक जिंकले होते. त्यात मंजूषा पिळर्णकर, दयानंद नाईक, कुणाली मांद्रेकर, दामोदर कासकर, दामोदर नाईक, प्रजय मयेकर यांचा समावेश होता.
तर विद्यमान आमदार संकल्प आमोणकर यांचे श्रद्धा आमोणकर, योगिता पार्सेकर हे दोन उमेदवार जिंकले होते. वास्को मतदारसंघातून तत्कालीन आमदार कार्लुस आल्मेदा यांचे नारायण बोरकर, दीपक नाईक, मातियस मोंतेरो, अमेय चोपडेकर, देविता आरोलकर, श्रद्धा महाले, फ्रेड्रिक हेन्रिक्स, यतीन कामुर्लेकर, कलाईयारासी धनपाल असे नऊ उमेदवार जिंकले होते. तर विद्यमान आमदार कृष्णा साळकर यांचे गिरीश बोरकर, शमी साळकर हे दोन उमेदवार जिंकले होते.
१. गेल्या लोकसभा निवडणुकीत (Election) मुरगाव मतदारसंघातील मतदारांची संख्या २०,३३६ तर वास्को मतदारसंघातील मतदार संख्या ३५,८८७ तसेच दाबोळी मतदारसंघातील मतदार संख्या २६,५५९ होती.
२. त्यामध्ये पालिका निवडणुकीपर्यंत भर पडणार आहे. येत्या पालिका निवडणुकीत २५ ऐवजी २७ प्रभाग असतील. त्यामुळे प्रभाग रचना बदलण्यात येईल.
३. मुरगाव मतदारसंघात दहा, वास्को मतदारसंघात १३ तर दाबोळी मतदारसंघात ४ प्रभागांचा समावेश करण्यात येईल, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. तथापि, सीमांकन बदलणार असल्याने मतदार विखुरले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांनी व्यूहरचना केली होती, त्यांना सीमांकन झाल्यावर नव्याने व्यूहरचना करावी लागणार आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत आल्मेदा यांच्यासह समर्थक नगरसेवकांची भाजपमध्ये (BJP) घरवापसी झाली. त्यामुळे भाजपला वास्को मतदारसंघात विद्यमान नगरसेवक तसेच नवीन इच्छुक उमेदवारांना तिकीट देताना कसरत करावी लागणार आहे. तीच स्थिती मुरगाव मतदारसंघातही आहे. मिलिंद नाईक यांचे सातही नगरसेवक अद्याप त्यांच्यासमवेत आहेत. त्यांची आणि आमदार आमोणकर यांची मने जुळलेली नाहीत.
या निवडणुकीसाठी कोणते प्रभाग महिला तसेच ओबीसींसाठी राखीव असतील, यावरही अनेकांची व्यूहरचना असेल. त्यामुळे इच्छुक तसेच विद्यमान नगरसेवकांपैकी काहीजणांचे लक्ष सीमांकन कधी होते, याकडे लक्ष लागले आहे. या पालिका निवडणुकीत आपले समर्थक निवडून यावेत, यासाठी आमदार साळकर आणि आमोणकर हे प्रयत्नशील आहेत.
विद्यमान नगरसेवकांपैकी काहीजण पुन्हा निवडणूक लढविणार नाही, असे सांगतात. तथापि, निवडणुकीची तारीख तसेच प्रभागाची रचना जाहीर झाल्यावर त्यांचे मन पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगामी निवडणुकीत दोन्ही आमदार आपल्या पसंतीचे आणि कट्टर समर्थकांनाच तिकीटे देतील. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांपैकी कितीजणांचे पत्ते कट होणार, हे लवकरच समजेल. मात्र, त्यांनीही रिंगणात टिकून राहण्यासाठी आपल्या परीने धावपळ सुरू केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.