Morjim Beach: नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांनी गर्दी केली आहे. नाताळ विकेंडला आल्याने राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित आहेत. या काळात समुद्रकिनाऱ्यावर ‘दृष्टी’ संस्थेच्या जीवरक्षकांनी धाडसी कामगिरी करत 14 जणांना बुडताना वाचवले. यात नऊ रशियन नागरिकांचा समावेश होता, अशी माहिती ‘दृष्टी’कडून देण्यात आली.
उत्तर गोव्यातील मांद्रे, मोरजी आणि इतर काही किनाऱ्यांवर बचाव कार्य करण्यात आले. मांद्रे येथील एका घटनेत रशियन नागरिक आई (वय 67 वर्षे) आणि मुलगी (वय 41 वर्षे) या लाटांच्या जोरदार प्रवाहात अडकल्यानंतर जीवरक्षक करण आणि रोहित यांनी बचावाची उपकरणे घेऊन दोघींना वाचवले.
किनाऱ्यावर आणून त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करून त्यांना जाण्याची परवानगी दिली. आणखी एका घटनेत 28 वर्षीय रशियन नागरिक प्रवाहात सापडल्यानंतर जीवरक्षक राहुल आणि अकशान यांनी बचावकार्य केले. मोरजी किनाऱ्यावर अन्य तीन घटनांमध्ये सहाजणांचे प्राण वाचवण्यात आले.
हरवलेल्या बालकांनाही पालकांकडे सोपविले
नागरिकांना बुडण्यापासून वाचवण्याव्यतिरिक्त ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी कळंगुट, मांद्रे, कोलवा आणि बागा या किनाऱ्यांवर हरवलेल्या सहा बालकांना आणि एका प्रौढ व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधून काढून त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले. याबद्दल ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.