
मोरजी: पंचायत क्षेत्रात, खिंड या ठिकाणी असलेले गोरख चिंचेचे झाड सध्या स्थानिकांना तसेच पर्यटकांना देखील आकर्षित करत आहे. सध्या हे झाड फुलांनी बहरले असून लवकरच ते वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या फळांनी लगडलेले दिसेल. पानगळीच्या या झाडाची झाडाची सर्व पाने डिसेंबर महिन्यात गळून पडतात आणि मे महिन्याच्या सुमारास या झाडाला नवी पालवी फुटते.
हे दुर्मिळ आणि शक्तिशाली औषधी गुणधर्म असलेले हे झाड मूळचे आफ्रिका-ऑस्ट्रेलिया भागातील असले तरी आता ते भारतातील वेगवेगळ्या राज्यात आढळते. आफ्रिका भागात आढळणारा हा वृक्ष अरब आणि आफ्रिकन लोकांनी भारतात आणला असावा.
खिंड, मोरजी येथील गोरख चिंचेचे झाड पोलीस अधिकारी राजेश कुमार यांच्या मालकीच्या जमिनीत उभे असून अनेक देशी-विदेशी पर्यटक त्याचे चित्रीकरण करत असल्याचेही दृश्य अधून मधून दिसते. शेकडो वर्षांपूर्वीचे हे झाड आहे असे येथील काही जाणकार म्हणतात. या झाडाच्या फळांमध्ये औषधी गुण आहेत व त्याचा वापर भारतीय औषधशास्त्रात नमूद झालेली आहे.
मायकेल ॲडन्सन या फ्रेंच निसर्ग शास्त्रज्ञाने या वृक्षाचे वर्णन सर्वप्रथम केल्यामुळे त्याच्या सन्मानार्थ गोरख चिंचेला ॲडन्सोनिया दिगिटाटा (Adansonia digitate) हे नाव देण्यात आले. साधारण ५० फुटांपर्यंत वाढणारा हा वृक्ष पानगळी झाडांमध्ये मोडतो. खोडाचा परीघ १०० फुटांपर्यंतही असतो.
फुले मांसल ५ पाकळ्यांची असून, लांब देठाने झाडावर लटकत राहतात व रात्री फुलतात. त्यांना मंद सुवास असतो. फुले गळून गेल्यानंतर तेथे बाटलीच्या आकाराची फूटभर लांबीची फळे येतात. ती राखाडी रंगाच्या व कठीण कवचाच्या दुधी भोपळ्यांसारखी दिसतात.
गोरखचिंचेच्या पानांत ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम व टार्टरेट असते. ताज्या बियांची भाजी करतात, तर काही वेळा त्या भाजून कॉफीऐवजी वापरतात. फळातील गरापासून शीतपेय करतात. गराचा उपयोग दाह कमी करण्यासाठी होतो. आव, अजीर्ण, अतिसार, भोवळ यांवर या पेयाचा उपयोग होतो. फळाच्या वाळलेल्या करवंट्यांचा उपयोग पाणी पिण्यासाठी करतात. या झाडाचे लाकूड हलके असल्यामुळे गुजरातमध्ये याच्या लाकडापासून मासेमारीसाठी होड्या तयार केल्या जातात. अंतरसाल उत्तम, टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.