Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News
Mopa International Airport | Goa Marathi News | Goa NewsDainik Gomantak

Mopa Airport : ‘मोपा’ला मिळणार मनोहर पर्रीकरांचे नाव

13 डिसेंबरला दिमाखदार सोहळ्यात उद्‍घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Mopa Airport : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आता ‘उड्डाण’ घेण्यास सज्ज होत आहे. या विमानतळाला गोव्याचे लाडके सुपुत्र व माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. येत्या 13 डिसेंबर रोजी पर्रीकर यांच्या वाढदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण करण्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. विमानतळाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आता केवळ युनायटेड नेशनच्या इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीएओ, कॅनडा) ची अंतिम मान्यता बाकी आहे. तीसुद्धा लवकरच मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोपा विमानतळाच्या उद्‍घाटनाच्या तारखा सतत बदलत गेल्या असल्या, तरी आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांना अधिकृत पत्र लिहून त्यांची वेळ मागितली आहे. ‘पीएमओ’ कार्यालयातून होकाराची पावती मिळताच उद्‍घाटनाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सचिवालयातील खास सूत्रांनी सांगितले. नागरी विमान वाहतूक महासंचालकांकडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरक्षेचा परवाना 26 ऑक्टोबर रोजी जारी झाल्यानंतर विमानतळ उद्‍घाटनाच्या हालचालींना वेग आला आहे.

‘आयसीएओ’ करणार पाहणी

इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीएओ) या युनायटेड नेशनच्या कॅनडा येथील कार्यालयाकडून जोपर्यंत मान्यता मिळाली नव्हती, तोपर्यंत मोपा विमानतळाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. जून 2013 मध्ये टेक्नो इकॉनॉमिक फिझिबिलीटी रिपोर्ट सादर झाल्यानंतर ही मान्यता मिळाली. त्यानंतरच निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. आता विमानतळ बांधून पूर्ण झाले असले, तरी ते खरोखरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे की नाही याची खात्री ही संघटना करणार आहे. त्यानंतरच गोव्यात या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरवण्यास मान्यता मिळणार आहे. मोपा विमानतळ बांधून तयार असल्याचा अहवाल अजून या संघटनेला सादर झालेला नाही. त्यामुळे उद्‍घाटन झाले तरी आंतरराष्ट्रीय विमाने या विमानतळावर उतरू शकणार नाहीत.

Mopa International Airport | Goa Marathi News | Goa News
Revolutionary Goans : नेत्यांच्या भेटीगाठींचा गुंता सुटला; मनोज परबांनी सांगितलं खरं कारण

विमानतळ चार टप्प्यांत होणार पूर्ण

‘बांधा वापरा आणि हस्तांतर करा’ या तत्त्वावर जीएमआर (ग्रांधी मल्लिकार्जुन राव) या आस्थापनाकडे मोपा विमानतळाचे काम सोपविण्यात आले आहे. त्यांचा हा करार 40 वर्षांसाठी झालेला आहे. मोपा विमानतळ चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यातील पहिला टप्पा जवळजवळ पूर्ण होत आला असून विमानतळ आता उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाची धावपट्टी

मोपा विमानतळावर तयार करण्यात आलेल्या दोन्ही धावपट्या पूर्णपणे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. अशा धावपट्या भारतात इतर कुठल्याच विमानतळावर नाहीत, असा दावा केला जात आहे. धुक्यामुळे किंवा पावसामुळे धावपट्टी दिसत नाही, त्यावेळी विमानाला आभाळात घिरट्या घालाव्या लागतात व दुसऱ्या विमानतळावर उतरावे लागते, तसा प्रकार मोपा विमानतळावर होणार नाही. कारण कुठल्याही स्थितीत त्या दिसणार आहेत. तशी यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात आली आहे. या धावपट्या साधारण साडेतीन किलोमीटर लांबीच्या असून कुठल्याही प्रकारचे मोठे जंबो विमान यावर उतरू शकते. विमानाचा वेग कितीही असला तरी त्याचा परिणाम होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com