
पणजी: पावसाळा तोंडावर असताना पर्यटन मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पावसाळी समस्यांवर उपाययोजना सुचवल्या असून २०मे पर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री खंवटे यांनी दिले.
बैठकीनंतर मंत्री खंवटे यांनी सांगितले की, मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला असून, सर्व विभागांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने काम करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही संभाव्य धोका निर्माण होण्यापूर्वी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत.
मंत्री म्हणाले की, वीज विभागाने २० मेपर्यंत आपले काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. पावसाळ्यात विद्युतपुरवठ्यात अडथळे येऊ नयेत यासाठी नियोजनबद्धपणे कामे उरकली जातील, असे विभागाकडून सांगण्यात आले. बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्याला दहा दिवसांनंतर पुनरावलोकन बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत प्रत्यक्ष कामांची प्रगती तपासण्यात येणार आहे आणि उर्वरित कामांबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या जातील.
पावसाळ्यात पर्वरीतील उड्डाणपुलाजवळील कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आले आहेत. काम सुरू असलेल्या भागात नागरिकांची सुरक्षितता प्रथम असल्याचे मंत्री खंवटे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.