
अॅड. सूरज मळीक
मान्सूनमध्ये जोरदार पाऊस पडल्यावर लहान मोठे मासे जणू सक्रिय होतात. सुकलेले ओहोळ जिवंत होतात. हे पाणी जेव्हा बारमाही वाहणाऱ्या नदी-नाल्यांत जाते तेव्हा तेथील लहान मोठे मासे थेट झऱ्यापर्यंत धावून वर येतात. काही मासे तर आपली पूर्ण शक्ती लावून उंच उडी घेत नदी पात्रातील धबधबे ओलांडून वर येतात. आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी त्यांची ती तळमळ असते. योग्य जागा निवडून तेथे अंडी घातली जातात.
दिवसा व रात्री दोन्ही वेळेस मासे पकडले जातात. परंतु गोमंतकीयांना रात्रीच्या वेळी दिवा घेऊन मासे पकडण्याची जणू विशेष ओढ लागलेली असते. कारण अंधार पडू लागला की बरेचसे मासे पाण्याच्या वरच्या भागास येऊन थांबतात आणि ते जास्त हालचाल करत नाहीत. त्यांच्यावर दिव्याचा उजेड पडला की जणू त्यांना पुढचे दिसत नाही आणि ते तिथून हलतच नाहीत. त्यामुळे त्यांना पकडणे सोपे होते. यालाच ‘दीपकावणी’ असे म्हणतात.
खायला चविष्ट लागणारे मासे म्हणून मोळये, शेंगाट, काडय, वाळय यासारख्या माशांची ओळख आहे. नदीपात्रात विविध माशांची विशिष्ट जागा ठरलेली असते.
त्यामुळे कोणते मासे कुठे मिळतील, हे गावातील अनुभवी माणूसच सांगू शकतो. काही मासे मातीमध्ये असतात, काही पाण्याच्या खालच्या तळाला असतात तर काही बिळात असतात.
बोडकेच्या पात्या तळा हाय गे वाळय थीगुर जाळ्याक सापडला
या ओळीमध्ये म्हटल्याप्रमाणे वाळय आणि थीगुर हे मासे बोडगी नावाच्या झुडपांच्या खाली आढळतात. गावातील झरे, ओहोळांच्या दोन्ही बाजूला, बोडगी वाढलेली दिसतात. हे दोन्ही मासे बुळबुळीत असतात आणि ते कडेला असलेल्या बिळात राहतात.
सोन्याची सारटी रे रुपयाची दोरी
असे आपुण बळीया मासे मारी,
बारीक सारीक मोळये मासे जिवना धाडी
मोटे मोटे मोळये मासे घरा हाडी
शिमगोत्सवातील या जत गीतात मोळयो या माशाचे वर्णन केलेले आहे. पूर्वी पावसाळ्यात घरोघरी या चविष्ट माशांची कडी केली जायची. नदीतील सगळेच मासे हातात पकडता येत नाही. कारण काहींच्या शरीरावर काटे असतात, काही माश्यांच्या तोंडाला नाजूक सुळे असतात तर काही मासे बुळबुळीत असल्यामुळे ते आपल्या हातातून निसटून जातात. त्यामुळे बांबूचे पाळणे धबधब्याच्या खाली ठेवून किंवा बांबू पासून बनवलेली खूण लहान ओहोळात दगडांनी घट्ट लावून किंवा हातात ‘शेणूल’ म्हणजेच जाळे धरून त्यांना पकडले जाते.
जसा शेवटा मासा खाऱ्या पाण्याच्या नदीत उड्या मारताना दिसतो, तसा पिट्टोळ मासा गोड्या नदीत उड्या मारताना दिसतो.
‘हुडोन शेवटो दिवटी धरी’ अशा शिगमो गीताच्या ओळीतून त्याच्या उडी घेण्याचा प्रत्यय येतो. त्याचप्रमाणे ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, व्हाळान नाचता पिट्टोळ’ असे जोशपूर्ण स्वरात म्हणून ढोलावर बडी मारून शिमगोत्सवातील वादनास सुरुवात केली जाते.
पिट्टोळ हा मासा वर्षभर आपल्या दृष्टीस पडतो. मान्सूनच्या पावसात तो जास्त प्रमाणात उड्या मारताना दिसतो. त्यामुळेच हा मासा ओहोळात नाचत असल्याचा उल्लेख आला असावा. हा मासा मात्र कुणाला खायला आवडत नाही, कारण तो कडू असतो.
जर त्याला खायचाच असेल तर चांगल्या प्रकारे स्वच्छ करून त्याची कडी करता येते. झरी, ओहोळाच्या काठावर खष्ट नावाची सदाहरित झाडे असतात. या झाडाची फळे पाण्यात पडून कुजतात तेव्हा त्यांना खाऊन पिट्टोळ मासा कडू बनतो असे सांगितले जाते. परंतु हा मासा खाऱ्या पाण्याच्या नदीतील मोठ्या माशांचे भक्ष्य असल्यामुळे त्याला जिवंत पकडून मिठाच्या पाण्यात ठेवून गरीला लावून चणाक, तामोशी, पोकार यांसारख्या माशांना पकडले जाते.
मान्सूनपूर्व पडलेला अवकाळी पाऊस चाढणीच्या माशांसाठी गोमंतकीयांना चाहूल लावून जातो. या पावसात मुसळधार पाऊस पडून जेव्हा मोठे लोंढेच्या लोंढे वाहतात तेव्हा त्या गढूळ पाण्यात काही प्रमाणात मासे सापडतात.
अवकाळीच्या पावसात मान्सून येईपर्यंत मातीमध्ये गांडूळ तयार झालेले असतात. एका गांडुळाचे १०-१२ तुकडे करून ते गरीला लावून मासे पकडले जातात. काही लोक पीठ लावतात. परंतु गांडूळच अधिक यशस्वी ठरतात. आता पकडलेले मासे घरी कसे न्यायचे? तर यासाठी त्यांना कसल्याच पिशवीची गरज भासत नाही.
जवळच असलेली ‘चिकीयाळे गुंडीयाळे’ नावाची वेल तोडून त्याचे एक टोक माशांच्या तोंडातून घालून त्यांना एक एक करून गुंतले जाते. कधीकाळी चिखलात आढळणारा चिखला, ढोलीतील काडय, वाळय, थिगूर, खवले असलेली खरच्याणी, सापासारखा काळपट लांबट हयेर, दाणय, घोळशी, मराल, बेल, पातका, शेंगाट, खडस यांसारखे एकापेक्षा एक गोड्या पाण्यातील मासे ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाच्या जगण्याचा मार्ग होता.
हयेर हा मासा विषारी असतो. त्यामुळे त्याला एक रात्र मिठाच्या पाण्यात घालून त्यावर वजन ठेवले जाते. काडय मासा बुळबुळीत असल्यामुळे त्याला चाकू मारून पकडले जाते. शेंगाट मासा काटा फुलवतो म्हणून त्याला गरी लावून पकडताना विशेष काळजी घ्यावी लागते. नाही तर रक्तस्राव होऊन अर्धा तास हात दुखू शकतो. अगदी संथपणे पाण्यावरती विसावलेले परंतु जवळ गेल्यावर चटकन पळून जाणारे लहान मासे म्हणजे टिकला नावाचे मासे. त्यांच्या डोक्यावर एक पांढरा ठिपका असतो जो सूर्यप्रकाशात चमकतो. परंतु या माशाला कुणी खात नाही.
जेव्हा ओसंडून वाहणाऱ्या ओहोळाचे पाणी वायंगण शेतीच्या मळ्यात पोहोचते तेव्हा तेथे माशांचे यथेच्छ दर्शन घेता येते. दिवसा खंड्या पक्षी माशांवर ताव मारताना आढळतो, तर रात्री हेवाळे नावाचा साप मासे खाताना दिसतो. त्याचबरोबर खेकडा आपल्या पुढच्या हाताने माशाला पकडून खाताना नजरेस पडतो.
ज्याप्रमाणे गावातील पुरुष शिमगो गीतात रमतात त्याचप्रमाणे येथील महिलासुद्धा या माशांची नावे फुगडी गीतांमध्ये घेताना दिसतात. पुरुषांनी घरी आणलेल्या माशांना घरातील महिला वैविध्यपूर्ण शिजवायच्या.
करन कट्ट्याची कडी गो यमुना
घोवाक जाली थोडी गो यमुना
घोवान मारली बडी गो यमुना
धारबांदोड्यातील उदाळशे गावातील महिला उड्या मारत गोलाकार फिरत या गीताचा आनंद घेतात.
पूर्वी करन कट्टा नावाचे मासे भरपूर प्रमाणात आढळायचे. नवऱ्याला या माशाची कडी थोडी झाली म्हणून त्याने बायकोवर बडी मारली असा उल्लेख केलेला आहे. यावरून ही कडी किती चविष्ट असते याचा प्रत्यय येतो.
त्याचबरोबर काही हास्य मधुर गाण्यातूनसुद्धा या माशांचे वर्णन केलेले आढळते. ‘व्हाळातली वाळय, बायल घोवाक चाळय’, वांते गावातील कुल्ल्याचे कवचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सणामध्ये हे गाणे म्हटले जाते. गोव्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला की १ जून ते ३१ जुलै पर्यंत समुद्रातील मासे मारण्यावर बंदी घातली जाते. तेव्हा गोमंतकीय लोकमानस गोड्या पाण्यातील चढणीचे मासे खाण्याकडे वळतात.
आपल्या पूर्वजांनी आपल्या दूरदृष्टीने मत्स्यसंपदेचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक संकल्पना आखल्या व पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून आपले जीवन समृद्ध केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.