monsoon 2023 Goa Waterfalls : नेत्रावळी अभयारण्यात असलेल्या मैनापी धबधब्यावर रविवारी दोघांचा बुडून मृत्यू झाल्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर वन खात्याने अभयारण्य क्षेत्रातील सर्व धबधबे पर्यटकांसाठी सध्या बंद केले आहेत.
अभयारण्य क्षेत्राचे दक्षिण गोव्याचे उपवनपाल अनिकेत गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या धबधब्यावर कुठलीही सुरक्षा यंत्रणा नाही, ते सर्व धबधबे पर्यटकांसाठी बंद केले आहेत. या धबधब्यांवर येणाऱ्या पर्यटकांना लाईफ जॅकेटस् पुरविण्याबाबत सध्या विचार सुरू झाला आहे.
स्थानिक पंचायतींना विश्वासात घेऊन ही योजना आम्ही चालीस लावण्याचा विचार करतोय. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी स्थानिक आमदार व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मंगळवारी बैठक बोलावली असून तीत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मैनापी धबधबा दुर्घटनेसंदर्भात बोलताना गावकर म्हणाले, वास्तविक हा धबधबा लहान असून आतापर्यंत तेथे कुठलीही दुर्घटना घडली नव्हती. काल रविवार असल्याने या धबधब्यावर अकस्मात मोठी गर्दी झाली.
पावसामुळे धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने आत ‘भोवरे’ तयार झाले. शिवदत्त नाईक (२७) हा युवक त्यात ओढला गेला. त्याला वाचविण्यासाठी जनार्दन सडेकर यांनी पाण्यात उडी घेतली. तेसुद्धा पाण्याच्या लोटाने वाहून जात असल्याने तेथे असलेल्या सुरक्षारक्षकाने पाण्यात उडी घेऊन त्यांना वर काढले.
परंतु वर काढल्यावर त्यांचा श्वासोच्छवास अचानक बंद झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे गावकर यांनी सांगितले.
ठळक दुर्घटना
फेब्रुवारी १४ : ओवरे-पाळोळे येथे समुद्रात बुडून सुप्रिया दुबे (२६) आणि विभू शर्मा (२७) या उत्तर प्रदेशातील पर्यटकांचा मृत्यू. दारू पिऊन रात्रीच्या वेळी समुद्रात उतरल्याने दुर्घटना.
एप्रिल २३ : केरी-पेडणे येथे समुद्रकिनाऱ्यावरील खडकावर उभे राहून सेल्फी काढत असताना समुद्राची लाट आल्याने दोघां पयर्टकांचा मृत्यू.
मे ११ : केरी समुद्रात रशियन पर्यटकाचा बुडून मृत्यू.
जून ११ : वागातोर किनाऱ्यावर सेल्फी घेताना पाण्यात पडल्याने उत्तर प्रदेशच्या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू.
यावर्षी 40 जणांना जलसमाधी
यंदा 2023 या साली आतापर्यंत एकूण 40 जणांना गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये जलसमाधी मिळाली. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त मृत व्यक्ती स्थानिक आहेत.
पोहायला न येताही पाण्यात उतरणे, समुद्रात स्नान करताना पुरेशी काळजी न घेणे, सेल्फीच्या मोहात तोल जाऊन पाण्यात पडणे आणि वाचवायला पुरेशी यंत्रणा नसणे ही त्यामागील मुख्य कारणे असल्याचे दिसून आले आहे.
देशी पर्यटकांची संख्या जास्त
दोन दिवसांपूर्वी बेतूल येथे पाण्याच्या लोटाने वाहून गेल्याने फातर्पा येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. यंदा बुडून मरण आलेल्यांमध्ये १२ पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील ११ पर्यटक देशी तर एक पर्यटक विदेशी आहे.
बुडून मृत्यू पावलेल्यांमध्ये ३१ पुरुष, ८ महिला तर एका लहान बालकाचा समावेश आहे. समुद्रात बुडून मरण पावलेल्यांची संख्या १६ आहे.
फक्त दूधसागरवर जीवरक्षक
राज्यात कित्येक धबधबे आहेत. पर्यटक या धबधब्यांवर आंघोळ करण्यासाठी जात असले तरी एक दूधसागर धबधबा वगळता अन्य कुठल्याही धबधब्यावर जीवरक्षक तैनात केलेले नाहीत.
दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना लाईफ जॅकेटस् दिली जातात. काल मैनापी येथे जी दुर्घटना घडली, त्या ठिकाणी फक्त दोन सुरक्षारक्षक तैनात होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.