Modern Tech For Cashew Apple Process in Goa: पाली-सत्तरीत काजू बोंडूवर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब करण्यात येत असून नव्या मशीनच्या साहाय्याने एकावेळी तीन टन बोंडूचा रस काढला जातो. त्यात सुमारे १० मोठे बॅरल रस मिळतो.
त्यानंतर हुर्राक, फेणीपर्यंतची प्रक्रिया या तंत्राद्वारे सहज होते. या मशीनमुळे वेळ वाचतो, शिवाय कमी कामगारात रसही अधिक मिळतो. पालीतील देविदास सावंतांनी अलीकडेच हा प्रकल्प सुरू केला आहे.
अत्याधुनिक पध्दतीचे मशीन असून या मशीनच्या साहाय्याने बोंडू यंत्रात घातल्यानंतर रस निघतो, हा रस एका टाकीत जमा होतो. त्यानंतर तो रस फिल्टर केला जातो. त्यानंतर रस गरम करण्यासाठी मोठ्या भांड्यात सोडला जातो.
त्या भाड्यात गरम झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी आणखीन एका टाकीत ते सोडले जाते. त्यानंतर या रसापासून उत्तम हुर्राक, काजू फेणी तयार होते.
सत्तरी हा पहिलाच प्रयोग असून मशीनसाठी एकूण 17 लाख खर्च येतो. याबाबत देविदास म्हणाले, पूर्वी कमी प्रमाणात बोंडू गोळा करुन रस काढून नंतर त्यावर पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करत होतो.
परंतु या नव्या यंत्राद्वारे उत्पादनही वाढते, शिवाय वेळही कमी लागतो. बोंडूच्या एका डब्याला 25 रुपये शेतकऱ्यांना दिले जाते आहे. शेतकऱ्यांनाही लाभ होतो, शिवाय फेणी उत्पादनासाठीही स्थानिक बोंडू उपयोगी ठरत आहेत.
गोव्यात 50 हजार हेक्टर काजू पिकाची लागवड होत आहे. त्यात 10,500 हेक्टर सत्तरीत उत्पन्न घेतले जाते. 80 टक्के शेतकरी काजू पिकावर अवलंबून आहे. काजू हा गोव्याचा ब्रॅंड मानला जातो, मात्र खऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला चांगल्या प्रकारे मिळणे गरजेचे आहे.
काजू बागायतीतून गोळा करणे, त्यानंतर बोंडू व बिया वेगळ्या करणे, बोंडूवर प्रक्रिया करून रस काढून नंतर हुर्राक, फेणी याची निर्मिती करणे हे करण्यासाठी खूप वेळ लागतो, आधुनिक यंत्राद्वारे या गोष्टी खूपच सुलभ झाल्या आहेत, असेही देविदास म्हणाले.
शेतकऱ्यांना अनुदानाची गरज
वाळपई कृषी अधिकारी विश्वनाथ गावस म्हणाले, अत्याधुनिक मशीनचा वापर करून बोंडूवर प्रक्रिया केली जात आहे. ही चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारची यंत्रे सत्तरीत शेतकऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
त्यासाठी सरकारने योजना आखून अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. सत्तरीत मोठ्या प्रमाणात काजू पीक घेतले जाते. मात्र शेतकऱ्यांना अनुदानाद्वारे फायदा झाला पाहिजे, सदर मशीन हे विजेवर चालते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.