Mobile tower contract under investigation
Mobile tower contract under investigationdainik gomantak

Goa News : नगरगावातील मोबाईल टॉवर करार चौकशीच्‍या घेऱ्यात!

घोटाळ्याचा आरोप : पंचायत संचालनालयाचे बीडीओंना तपासाचे निर्देश
Published on

वाळपई : नगरगाव-सत्तरी पंचायत कार्यक्षेत्रात सन २०१७ -१८ या कालावधीत मोबाईल टॉवर घोटाळा झाला असल्‍याच्‍या आरोपानंतर सत्तरी तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, असे निर्देश गोवा पंचायत संचालनालयाच्या कार्यालयातून जारी झाले आहेत. सदर निर्देशाची प्रत तक्रारदार अर्जुन आपा गुरव यांना प्राप्त झाली आहे. गुरव यांनी गोवा पंचायत संचालनालय पणजी, दक्षता विभाग तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मोबाईल टॉवर कर वसुलीत घोटाळा झाल्याची तक्रार केली होती.

याबाबत पूर्वपीठिका अशी की, सर्वांत युवा सरपंच म्हणून निवडून आलेले नगरगाव सत्तरी पंचायतीचे माजी सरपंच पराग खाडिलकर यांच्या सन २०१७ ते २०१८ ह्या कार्यकाळात लाखो रुपयांचा मोबाईल टॉवर घोटाळा झाला, असा आरोप अर्जुन आपा गुरव यांनी केला आहे. सदर दावा कसा योग्‍य आहे, हे सिद्ध करण्‍यासाठी त्‍यांना माहितीच्‍या अधिकाराखाली प्राप्‍त झालेली कागदपत्रेही संबंधित अधिकारणीला सादर केली आहेत.

गुरव यांनी तक्रारीत म्‍हटले होते की, नगरगाव पंचायतीत सात मोबाईल टॉवर आहेत. मात्र, पंचायतीने संबंधित टॉवर कंपनी अथवा त्‍यासाठी ज्‍यांच्‍या जमिनी वापरण्‍यात आल्‍या आहेत त्‍यांच्‍याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले नाही.

करार होऊनही रक्‍कम दिली नाही

तसेच तत्कालीन सरपंच पराग खाडिलकर यांनी पंचायतीच्या वतीने त्यांचे वडील पुरुषोत्तम खाडिलकर यांच्याशी सन २०१७ साली ब्रह्माकरमळी येथील जागेत असलेल्या मोबाईल टॉवरविषयी करार केला आणि त्‍यानुसार पंचायतीला वार्षिक १६,५०० रुपये भाडे पुरुषोत्तम खाडिलकर यांनी द्यावे, असे ठरविण्यात आले. तथापि, संबंधितांनी पंचायतीला भाडे दिले नाही, अशी माहिती समोर आल्‍याचा दावा गुरव यांनी केला आहे.

लाखोंचा महसूल बुडाला :

खाडिलकर यांच्‍या व्‍यतिरिक्‍त अन्‍य तीन जणांशी भाड्यासंदर्भात करार झाला होता. त्‍याची पूर्तताही झालेली नाही, असेही गुरव यांनी म्‍हटले आहे. परिणामी पंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे, असे तक्रारीत नमूद करण्‍यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com