Mobile Connectivity in Goa : खोतीगाव पंचायत क्षेत्रातील नागरिकांना तब्बल 1101 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते मोबाईल कनेक्टिव्हिटी बहाल करण्यात आली अन् स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
यावेळी व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, स्थानिक सरपंच आनंदू देसाई, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, जिओ कंपनीचे अधिकारी दीपक झा, नगरसेवक हेमंत नाईक गावकर, मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, सर्व पंच सदस्य आदी उपस्थित होते.
यानिमित्त खोतीगाव पंचायतीच्या पटांगणावर आयोजिलेल्या कार्यक्रमात सभापती रमेश तवडकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेली चर्चा यशस्वी ठरल्याने 2,223 कोटी रुपयांची कामे नजीकच्या काळात होतील. 1 डिसेंबरपूर्वी खोतीगाव पंचायत क्षेत्रातील रस्ते हॉटमिक्स करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभापती तवडकर यांना फोन करून खोतीगाववासीयांना शुभेच्छा दिल्या तसेच तवडकर व स्थानिक सरपंचांनी केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात कौतुक केले. सरपंच आनंदू देसाई यांनी प्रास्ताविक केले.
राज्यात उभारणार 300 टॉवर
जिओचे अधिकारी दीपक झा म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच सभापती तवडकर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच अभयारण्य क्षेत्रात अवघड असे काम पूर्ण होत आहे. संपूर्ण गोव्यात 300 टॉवर उभारण्याचे उद्दिष्ट आहे. आजपासून कनेक्टिव्हिटी झोनमध्ये आपला समावेश होत आहे. यानिमित्ताने स्थानिकांना मोफत सीम कार्ड तसेच मोबाईल फोनवर 2 हजार रुपये सवलतीची घोषणा त्यांनी यावेळी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.