मडगाव: खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली काेलवा पोलिसांनी अटक केलेल्या टायसन उर्फ नासीर मसूद याच्याकडून गुन्हा वदवून घेण्यासाठी जो ‘थर्ड डिग्री’चा वापर केला होता, त्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केल्यानंतर फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत त्यावर आवाज उठवून कोलवा पोलिस स्थानकाच्या निरीक्षकावर कारवाईची मागणी केली.
या संशयिताने यापूर्वी मडगाव न्यायालयात त्याला रिमांडसाठी आणले असता, पाेलिसांनी आपल्याला मारहाण करण्यासह पायाच्या अंगठ्याचे नख उखडून काढले, असे न्यायालयात सांगितले होेते.
‘गोमन्तक’ने ६ ऑगस्टच्या अंकात ‘गुन्ह्याची कबुली घेण्यासाठी पोलिसांनी डोके भादरले!’ या मथळ्याची बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध केली हाेती. यावर विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत आवाज उठवला. यासंदर्भात आपल्याकडे तक्रार आलेली आहे. तो आरोपी असला तरी त्याचा छळ पाहता आम्ही गोव्यात आहोत की, दुसरीकडे असे वाटण्याजोगी स्थिती आहे. संबंधितावर कारवाईची गरज असून मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावे, असे त्यांनी सांगितले.
विधानसभेत ‘गोमन्तक’च्या बातमीची दखल घेण्याची ही दुसरी वेळ असून यापूर्वी मायणा-कुडतरी पोलिसांना तुरी देऊन दोघांनी पळ काढला हाेता. बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी शून्य प्रहारात हा मुद्दा उचलून गोव्यातील पाेलिस ‘झोकलेल्या’ स्थितीत असतात का, असा प्रश्न केला हाेता.
काेलवा पोलिसांनी कोठडीत मारहाण केली, अशी तक्रार टायसनने केल्यानंतर मडगाव न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली हाेती. त्यानंतर आता कोलवा पोलिसांनी टायसनसह अक्षय तलवार या दोघांवर आणखी दोन गुन्हे नोंद केले आहेत. यातील एक गुन्हा २६ एप्रिल रोजी तर दुसरा गुन्हा ६ जून रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.पहिली तक्रार हरेश राठाेड, तर दुसरी सुदन शिरोडकर याने दिली हाेती. टायसनच्या दहशतीमुळे तक्रारदार तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. आता त्याला अटक केल्यामुळे तक्रारदार पुढे येऊ लागले आहेत, असे कोलवा पोलिसांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.