वास्को: वास्को शहर परिसरातील विनावापर उभी असलेली वाहनामूळे शहरातील अनेक ठिकाणांची अवस्था दयनीय झाली आहे. या विनावापर उभी वाहने हटवण्यासाठी वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी पुढाकार घेतलेला असून त्यांनी वाहतूक पोलिसांना अशा वाहनांविरुद्ध कारवाईच्या सूचना केल्या आहेत.
(MLA Daji Salkar will remove the unused vehicles parked in Vasco city)
वास्को शहर व परिसरात मागच्या बऱ्याच वर्षांपासून विविध ठिकाणी अगदी रस्त्याच्या बाजूला किंवा फुटपाथवर दुचाकी, चार व मोठी वाहने भंगार अवस्थेत आहेत. शहरात काही ठिकाणी अशी वाहने पार्किंगची जागा अडवून उभी आहेत. अशा वाहनांमुळे शहरातही बकाल अवस्था निर्माण होत आहे. हा विषय मागच्या बऱ्याच वर्षापासून चर्चेचा बनला आहे. अशा विनावापर वाहनांचे मालक शोधून काढून ती वाहने हटविण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न यापूर्वी सफल झालेले नाहीत.
वाहनांचे मालकही बिनधास्त आहेत. बऱ्याच वर्षांपासून भंगार अवस्थेतील या वाहनांची समस्या सतावत असून स्थानिक आमदार दाजी साळकर हे नगरसेवक असतानापासून या समस्येमागे आहेत. मात्र, त्यांना ही वाहने हटवण्यात यश आले नाही. आता वास्कोचे आमदार या नात्याने साळकर यांनी पुन्हा हा प्रश्न हाती घेतलेला आहे.
वास्को परीसरात जवळपास दोनशे विनावापर वाहने उभी असून ती हटवण्यात येणार असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. संबंधित वाहनांच्या मालकांनी कारवाई होण्यापूर्वी आपापली वाहने उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासंबंधी त्यांनी वाहतुक पोलिसांशी चर्चा केली व कारवाईच्या सूचना त्यांनी वाहतूक पोलिसांना केल्या.
कारवाईपूर्वी संबंधित वाहन मालकांना शोधून वाहने हटविण्यासाठी काही दिवस देण्यात येणार असून अन्यथा ती हटवण्यात येतील, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर दिली आहे. यापूर्वी वाहतूक विभागाने रस्त्यांवरील काही वाहने हटवली होती अशीही माहिती त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.