मायरिस्टीका ही रानटी जायफळाच्या प्रजातीची झाडे असून, गोव्यात काही मोजक्याच दलदलीने युक्ल वनक्षेत्रात त्यांचे दर्शन घडत असते. सत्तरी तालुक्यातल्या ब्रहमा करमळी आणि माळोली अशा नगरगाव पंचायत क्षेत्रातल्या गावांत असे वैशिष्ट्यपूर्ण जंगल पहायला मिळत असून, गोव्यात त्यांचे दर्शन नेत्रावळी अभयारण्यात सांगे तालुक्यात तीन ठिकाणी झालेले आहे.
मायरिस्टीका दलदलीचे जंगल संपूर्ण जंगात काही मोजक्याच ठिकाणी पहायला मिळत असून,भारतात त्यांचे अल्प प्रमाणात वनक्षेत्र पश्चिम घाटातल्या उष्णकटिबंधीय मौसमी हवामानात आविष्कार दृष्टीस पडतो दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका यांनी युक्त गोंडवनातील आफ्रिकेजवळील मादागास्कर बेटाला जोडलेला भारताचा आजचा भूभाग आठ ते दहा कोटी वर्षांपूर्वी सुटून निघाला या साऱ्या भूगर्भशास्त्रातल्या घडामोडींशी नाते सांगणारे मायरिस्टीकाचे जंगल आहे. वनस्पतीशास्त्रातल्या संशोधकांनुसार हे वैशिष्ट्यपूर्ण जंगल 140 कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. इतक्या कोट्यावधी इतिहासाचा वारसी सांगणाऱ्या मायरिस्टीकाच्या जंगलाचा शोध सत्तरीतल्या माळोली गावातल्या निरंकाऱ्याच्या राईत लागला होता. त्यानंतर असे जंगल ब्रह्माकरमळीत आजोबाची तळी या देवराईत आणि तेथून जवळच असलेल्या बिबट्यान येथे दृष्टीस पडले होते.
सत्तरीप्रमाणेच दक्षिण गोव्यातला सांगे तालुका जंगलांनी समृद्ध असून, तेथील नेत्रावळी अभयारण्याची 1999 साली जर अधिसूचना आली नसली तर दलदलीत असलेले वैशिष्ट्य पूर्ण जंगल विस्मृतीत गेले असते. या अभयारण्यात येणाऱ्या भाटी या सहयाद्रीतल्या पर्वतरांगांत वसलेल्या गावात रानटी जायफळ आणि बिबटीचा वृक्षांनी नटलेले समृद्ध असे सदाहरित जंगल आहे, जेधील मुळे इंग्रजीतल्या `यु' अक्षराच्या उलट्या आकाराची आहेत. वृक्षांच्या अशाप्रकारच्या मुलांच्या संरचनेमुळे बारामाही खळाळते पाणी येथे असल्याने असंख्य कृमीकीटक, पशुपक्षी यांच्यासाठी बाराजण येथील वागापेड त्याचप्रमाणे सुर्यगाळ नैसर्गिक अधिवास ठरलेली आहे. नेत्रावळी अभयारण्याच्या कक्षेत येणाऱ्या नेतूर्ली बारामाही कोसळणाऱ्या सावरी धबधब्याचे दर्शन घेण्यासाठी जाताना मायरिस्टीकच्या जंगलाचे विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरचे संचित पहायला मिळते. नेत्रावळी अभयारण्यात आणि त्याच्या कक्षेच्या सीमेवरचे मायरिस्टीकाच्या येथील जंगलाचे गतवैभव या परिसराच्या कोट्यावधी वर्षांच्या इतिहासाची प्रचिती आणून देत आहे. या ठिकाणाच्या पाऊस, आर्द्रता, उष्णता, थंडी, वारा यांच्याशी आणि तिथल्या पाणघळीच्या जमिनीशी जुळवून घेऊन खरंतर अशा वृक्षांच्या प्रजाती आपले अन्न घटक मिळवत असतात आणि त्यांनी निर्माण केलेल्या परिसंस्थेत असंख्य असे कृमीकीटक, पशुपक्षी जीवन जगत असतात.
बाराजण-वागापेड येथील मायरिस्टिकांनी युक्त परिसंस्था प्रदेशनिष्ठा अशा उभयचरांच्या प्रजातींबरोबर- वृक्षाच्छादनात विहरणऱ्या मलाबार ट्री निम्फसारख्या- फुलपाखरांबरोबर राखाडी धनेशाच्या जगण्याला आधार देत असतात. येथील वनस्पतींनी खारफुटीसारखे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेतलेले असल्याकारणाने गेल्या कित्येक वर्षांपासून मॉन्सूनच्या पावसाळ्याचे पाणी आपल्या मुळाद्वारे भूगर्भात साठवून ठेऊन ते हिवाळी तसेच उन्हाळी मौसमात उपलब्ध करून देण्याचे कार्य आरंभलेले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जेव्हा जंगली श्वापदे पेयजलासाठी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करतात तेव्हा हे जंगल बारामाही थंडगार, चवदार पेयजलाचा निरंतर पुरवठा करतात. मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या वेळी ही नैसर्गिक मुळांची संरचना महापुराच्यावेळी तेथील परिसरातील मातीची धूप रोखते आणि जमिनीची सुपिकता संरक्षित करण्याचे योगदान करत असते.
भाटी येथील बाराजण परिसरातील मायरिस्टिकाच्या जंगलातून उगम पावून बारा महिने अखंडपणे वाहणाऱ्या पाण्याचा वापर येथील स्थानिकांनी पाटांद्वारे नेऊन परिसरातल्या शेती, बागायतींच्या मळ्यांना फुलवलेले आहे. जंगलातील पशुपक्ष्यांबरोबर इथल्या कष्टकऱ्यांचे जगणे समृद्ध करण्याचे कार्य गेल्या कित्येक शतकांपासून मायरिस्टीकाच्या वनक्षेत्राने केलेले आहे. पृथ्वीच्या कोट्यावधी वर्षांच्या सजीव सृष्टीच्या इतिहासाची साक्षीदार असणारी ही परिसंस्था आम्हाला निसर्गाने दिलेली अनमोल अशी देणगी आहे. तिच्या नैसर्गिक वैभवाचा वारसा टिकवण्यात सजीवमात्रांचे कल्याण दडलेले आहे. याविषयी जाणिव जागृत ठेऊन या संचिताचे संरक्षण आणि संवर्धन करण्यातला गोमंतकीय समाजाने प्राधान्य दिले तर वैश्विक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या संकटांना सामोरे जाताना अशी जंगले जीवनाधार ठरणार आहेत.
नेत्रावळी अभयारण्यातल्या कक्षेत सांगे तालुक्यातल्या भाटीत मायरिस्टीका प्रजातीतले दलदलीतले वैशिष्ट्यपूर्ण असे आणखी एक जंगल तळावलीत असून, 1999 साली अभयारण्याची अधिसूचना काढल्यानंतरसुद्धा इथल्या परिसरात लोह आणि मँगनिज खनिजांच्या उत्खननासाठी खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू होते. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या केंद्रीये उच्चाधिकार समितीने म्हादई आणि नेत्रावळी अभयारण्यातली गवताची काडी काढण्यास मनाई केल्याने मॅगनिज खाणीचा प्रस्ताव मूर्तीस्वरूपात आला नाही. त्यामुळे तळावली येथील विलोभनीय असे मायरिस्टिकाचे जंगल सुरक्षित राहू शकले. मायरिस्टिकाच्या इथल्या समृद्ध जंगलातून बारामाही वाहणाऱ्या झऱ्याचा उगम होत असल्याने इथे वास्तव्यात असलेल्या आदिवासी जमातीबरोबर अन्य जंगलनिवासी जनतेन या स्थळास तळावली असे नाव प्रदान केले होते. तळावलीतल्या या पाण्यावरती इथला ओहळ पेयजल आणि सिंचनाचे पाणी घेऊन अखंडपणे वाहत होता.याच पायाच्या आधारे तळावली परिसरातल्या कषकऱ्यांनी शेती आणि बागायतींना समृद्ध केले होते.
तळावली येथील या मायरिस्टिकाच्या जंगलात जी वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था आणि पाणथळ असल्याकारणाने वर्षभर पक्षी, रानटी जनावरे, जलचर, उभयचरांचे वास्तव्य अनुभवायला मिळत असले. गेल्याचे राज्य फुलपाखरू म्हणून सन्मान लाभलेले मलय वृक्षपरी सकाळ आणि संध्याकाळी 'वेमुक्तपणे वृक्षाच्छादनातून विहार करताना दृष्टीस पडत असते. वनस्पती जे वैभव या जंगलात असल्याकारणाने त्यांच्या फळाफुलांवरली गुजराण करणारे कृमीकीटक आणि त्यांच्यावरती ताव मारणार पक्षीही प्रामुख्याने पहायला मिळतात. भाटीत वाघापेड, सूर्य आणि तळावली येथील मायरिस्टिकाचे जंगल क्षेत्र लाभलेले आहे ते दक्षिण गोव्यातल्या नैसर्गिक वैभवास मानाचा तुरा खोवणारे असेच आहे. ज्या काळात आपल्या आदिमानवाच्या पाऊलखुणा या, मातीत उमटल्या नव्हत्या त्या जुरासिक पार्कशी नाते सांगणारे हे वनक्षेत्र असून त्याचे रितसर संशोधन वनस्पती शास्त्रज्ञ आणि प्राणि- शास्त्रज्ञांनी केले तर विस्मृतीत जाण्याच्या मार्गावरती असलेल्या निसर्गातल्या खजिनाचे पैलू समजातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.