पणजी: गृहनिर्माण मंडळाने बांधलेली आणि नंतर त्यातील सदनिका इतरांना दिलेल्या जीर्ण इमारतीची आता फेरबांधणी करायची असल्यास सरकार आणि मंडळ त्यासाठी शक्य ती मदत सदनिकाधारकांना करेल, असे आश्वासन राज्याचे गृहनिर्माण मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज विधानसभेत दिले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय दोन दिवसांपूर्वी उपस्थित केला होता.
अमोणकर म्हणाले, वास्कोतील ही इमारत ५५ वर्षे जुनी आहे. तिचा स्लॅब होता कोसळू लागला आहे. राहण्यासाठी ती असुरक्षित होऊ लागली आहे. तेथे दुर्घटना घडली तर त्याचे सारे खापर गृहनिर्माण मंडळावरच येणार आहे. मंडळाच्या अध्यक्षांनी दहा बैठका सदनिकाधारकांसोबत घेतल्या आहेत. त्या इमारतीत राहणाऱ्यांचे इतरत्र स्थलांतर करून त्या इमारतीची पुन्हा बांधणी करण्याची गरज आहे.
कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल म्हणाले, मंडळाने सदनिकाधारकांनी सर्व हप्ते भरल्यानंतर त्यांच्याकडेच मालकी हक्क दिला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या सोसायटीला या इमारतीच्या फेरबांधणीचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. आमदारांनी आधी मालकी हक्क हस्तांतरणांवर भर द्यावा. अमोणकर हेच बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांनी आठ मजली इमारत तेथे बांधावी.
सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी खारी रेती बांधकामात वापरली गेल्याने इमारती कोसळण्याची स्थिती उद्भवल्याकडे लक्ष वेधले.
मंत्री म्हणाले, गृहनिर्माणच्या नियमानुसार सदनिकाधारकांनी सोसायटी स्थापन करणे आवश्यक असते. या इमारतीबाबत १९८४ मध्ये ३२ कमी उत्पन्न गटातील सदनिकाधारकांनी सोसायटी स्थापन केली आहे. जीर्ण प्रमाणपत्र मिळवल्यावरच ते मंडळाकडे येऊ शकतील, असे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे.
मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले, गृहनिर्माण मंडळाने बांधलेल्या इमारती आता जुन्या होऊ लागल्या आहेत, हा प्रश्न सार्वत्रिक आहे. मूठ मारली तर भिंत हलते, असा या बांधकामांचा दर्जा आहे. या इमारतींची फेरबांधणी सदनिकाधारक किंवा मंडळाला शक्य होणार नाही. या कामासाठी विकसकालाच बोलावले गेले पाहिजे. चटई क्षेत्र वाढवून घेऊन हा प्रश्न सोडवता येऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.