Subhash Shirodkar : ‘ते’ वक्तव्य चांगल्या हेतूनेच; मंत्री सुभाष शिरोडकरांचं घुमजाव

मंत्री शिरोडकरांनी जमिनी पडीक ठेवणे हा मोठा गुन्हा आहे, अशा जमिनी सरकार आपल्या ताब्यात घेणार, असे अलिकडे ते म्हणाले होते. त्यामुळे सरकारवर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते.
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarDainik Gomantak

Subhash Shirodkar : मुळात पडीक जमिनी या सरकार आपल्या ताब्यात घेण्याची तरतूद यापूर्वीच कायद्यात आहे. हे वक्तव्य चांगल्या हेतूनेच करण्यात आलेले, जेणेकरुन शेतकरी शेती-बागायतीकडे पुन्हा वळतील. जमिनी ताब्यात घेणार, असे म्हटल्यावर लगेच कुणी कायद्याचे कलम जारी करत नसते. परंतु, याचा अर्थ आम्ही शेती पडीक ठेवू नयेत, असे म्हणत जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी घुमजाव घेण्याचा प्रयत्न केला. मंत्री शिरोडकरांनी जमिनी पडीक ठेवणे हा मोठा गुन्हा आहे, अशा जमिनी सरकार आपल्या ताब्यात घेणार, असे अलिकडे ते म्हणाले होते. त्यामुळे सरकारवर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते.

सोमवारी पर्रा येथे माडांनी तळ्याच्या सौंदर्यीकरणाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार मायकल लोबो, पर्रा सरपंच चंदू हरमलकर, उपसरपंच डॅनियल लोबो व इतर मान्यवर हजर होते. या सौंदर्यीकरणाला 20 लाख रुपये खर्च आला. या तळीचा वापर हा गणपती विसर्जनासाठी होणार आहे.

मुळात जमिनी पडीक ठेवून शेतकऱ्यांचे उत्पन्न हे कधीच दुप्पट होणार नाही. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना जमिनी कसावीच लागेल. पडीक जमिनी ठेवणे हा एकप्रकारे गुन्हा आहे, असे मला वाटते. त्यामुळे त्यावेळी मी तशी सूचना केली होती, असे म्हणत मंत्री शिरोडकर यांनी घुमजाव घेण्याचा प्रयत्न केला.

मंत्र्यांनी उदाहरण देताना सांगितले की, आम्ही अनेकदा लहान मुलांना गप्प बस, अन्यथा छडीने मारणार असे म्हणतो. परंतु, तसे कधीच करत नसतो. तशाच प्रकारे, सरकार असे काहीच करणार नाही आहे. फक्त शेतकऱ्यांनी शेतीकडे पुन्हा वळावे, हाच त्यामागचा चांगला हेतू होता. आम्ही काही जमिनी ताब्यात घेणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्री शिरोडकरांनी दिले.

कालवे दुरुस्तीचे निर्देश

पडीक शेती लागवडीखाली आणण्यासाठी पंचसदस्य, झेडपी, आमदार या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत लोकांना प्रोत्साहन द्यावे, असे सांगत मंत्री शिरोडकर म्हणाले की, सरकारने कालव्यामार्फत राज्यात पाणी पोचविले आहे. मात्र, एखादी गोष्ट विनावापर पडून राहिल्यास परिणाम होतोच. तशीच स्थिती ही कालव्याची झाली असून, आवश्यक ठिकाणी दुरुस्तीचे निर्देश मी दिल्याचे मंत्री शिरोडकर म्हणाले. तिलारी व हणजूण धरणामुळे उत्तर गोव्याची ताण भागते. राज्यात पाण्याची कमतरता नाही, याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com