दाबोळी : वास्को येथील मुरगाव नगरपालिकेची प्रशासनाची पुरातन इमारतीच्या नूतनीकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून यात पूर्णपणे नगरविकास मंत्री मिलिंद नाईक जबाबदार आहे. तसेच राज्य नगर विकास संस्थेचे (सुडा), कंत्राटदार व इतर अधिकारीसुद्धा घोटाळ्यात सामील असल्याची माहिती गोवा प्रदेश (Goa region) काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Chairman Girish Chodankar) यांनी दिली. मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी यापूर्वी अनेक घोटाळे केले असून यात त्यांना पूर्णपणे राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांचा पाठिंबा आहे. यासाठी आमदार मिलिंद नाईक व सूडाचे अधिकारीवर्गाची प्रथम चौकशी करावी, नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.
तसेच मुरगाव नगरपरिषदेच्या हेरिटेज इमारतीच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी हेरिटेज संवर्धन समितीची नियुक्ती करा आणि हेरिटेज इमारत जीर्णोद्धार घोटाळ्यातील विद्रुपीकरण, नुकसान आणि फसवणूक केल्याबद्दल कंत्राटदार आणि मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर एफआयआर दाखल करा. हेरिटेज वास्तू जीर्णोद्धाराच्या कामांच्या निविदा काढण्यापूर्वी कामाची व्याप्ती, अंदाज जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच मुरगाव नगरपालिकेच्या पुरातन इमारतीचे छप्पर यावरील लाकूड नुतनीकरणासाठी काढण्यात आले होते ते चोरीस गेल्याची खळबळजनक माहिती काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
वास्को बायणा येथील मुरगाव काँग्रेस (Congress) गटाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, गोवा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान, दक्षिण गोवा काँग्रेस इतर मागासवर्गीय अध्यक्ष नितीन चोपडेकर, मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष महेश नाईक, मुरगाव काँग्रेस महिला अध्यक्ष सीमा बेहरे, मुरगाव युवा काँग्रेस अध्यक्ष सौरव भगत उपस्थित होते. पुढे बोलताना काँग्रेस नेते चोडणकर म्हणाले की मुरगाव नगरपालिका इमारतीच्या नूतनीकरणासाठी 9 करोड 28 लाख रुपये मंजूर झाले असून यातील फक्त 3 करोड 50 लाखात पूर्ण इमारतीचे नूतनीकरण होऊ शकते अशी माहिती इमारत बांधकाम करणाऱ्या आर्किटेक्टतर्फे आम्हाला माहिती प्राप्त झाली आहे.
यामुळे 9 करोड रुपयातील 6 करोड रुपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. तसेच पालिकेच्या इमारतीवरील छपरावरील पोर्तुगिजकालिन कवले लाकूड काढून तेथे लोखंडी पत्रे बसून एका प्रकारे संबंधित विभागाने करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. पालिकेच्या छपरावरील लाकूड सूडाच्या कंत्राटदाराने काढून इमारतीखाली खालीच ठेवले होते ते सर्व लाकूड चोरीस गेल्याची खळबळजनक माहिती काँग्रेस नेते चोडणकर यांनी दिली.
पालिकेची इमारत पुरातन काळातील असल्याने याची सर्वप्रथम माहिती जाणून घेऊन सूडाच्या अधिकाऱ्यांनी नंतर पालिकेला नूतनीकरणाला सुरुवात करणे गरजेचे होते. पण सूडाने नूतनीकरणवेळी पुरातन विभागाला सामावून न घेता पालिकेच्या इमारतीचे काम करून करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. सदर पालिकेच्या नूतनीकरणास राज्य नगर विकास संस्था सुडा व नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला असल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्याने त्वरित मिलिंद नाईक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी चोडणकर यांनी केली.
पण मुख्यमंत्री मंत्री नाईकावर कधीच कारवाई करणार नाही. मंत्री मिलिंद नाईक यांनी यापूर्वी अनेक घोटाळे केले होते. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सदैव मंत्री मिलिंद नाईक यांना पाठिंबा दिलेला आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारावर आरोप करणे म्हणजे मुरगाव नगरपालिका इमारतीत करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. पालिका इमारत पुरातन असल्याने सर्वप्रथम पुरातन विभागामार्फत इमारतीची पुन्हा तपासणी करावी.
तोपर्यंत इमारतीचे बांधकाम सूडाच्या कंत्राटदाराने बंद करावे अशी मागणी काँग्रेस नेते चोडणकर यांनी केली. राज्यात होत असलेल्या मोठ्या प्रकल्पात सुद्धा सत्ताधारी पक्षाने करोडो रुपयांचे घोटाळे केले आहे. गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीमुळे जनता हैराण झाली आहे. यासाठी राज्य सरकारच्या विरोधात बुधवारी सायंकाळी 4 वाजता गोवा वेल्हा तिसवाडी येथे शांतताप्रिय पदयात्रा काढणार असल्याची माहिती शेवटी काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी दिली.
गोवा काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर म्हणाले की नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्यासाठी घोटाळे नवीन नाहीत, ज्यांनी यापूर्वी नूशी नलिनी जहाज हाताळणी, नापथा विक्री, कचरा प्रक्रिया प्रकल्प घोटाळा, लोखंड चोरी घोटाळा आणि घर बांधण्यासाठी सरकारी जमीन बळकावली आहे. मंत्री मिलिंद नाईक यांनी आपण घोटाळा करण्यास तयार असल्याचे कॅमेर्यासमोर मान्य केले, ही धक्कादायक बाब आहे. मुरगाव नगरपालिका इमारतीचे नूतनीकरण सत्ताधारी पक्षातील मंत्री मिलिंद नाईक पूर्णपणे जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. यापूर्वी मंत्री मिलिंद नाईक यांचा नाफ्ता नुसी नलिनी जहाज प्रकरण एम पी टी मधील खाण चोरी प्रकरणात सुद्धा सहभाग असल्याने राज्य सरकारने त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी आमोणकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.